मुंबई: मॉरिस हा परिपूर्ण व्यक्ती नसेल पण सध्या सोशल मीडियावर ज्याप्रकारे त्याची प्रतिमा रंगवली जात आहे, तसा खलनायक तो नव्हता, असे वक्तव्य मॉरिसची पत्नी सरीना नोरोन्हा यांनी केले. जे काही घडले त्याचा मला आयुष्यभर पश्चाताप राहील. माझ्या मुलीने तिचे वडील गमवल्यामुळे मी जितकी दु:खी आहे, तितकेच वाईट मला अभिषेक घोसाळकर यांच्या मुलांबद्दलही वाटत आहे, असेही सरीना यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराच्या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. मॉरिस नोरोन्हा याने गुरुवारी रात्री घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून आयुष्य संपवले होते. या पार्श्वभूमीवर 'मिड डे' या दैनिकाला दिलेल्या मुलाखती मॉरिसची पत्नी सरीना हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
सरीना हिने मॉरिसची बाजू मांडताना म्हटले की, मला फक्त एकच गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे की, एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये की, त्याच्या कृतीचे परिणाम वेदनादायी असतील. जी काही घटना घडली आहे, त्यासाठी मॉरिसचे शत्रूही तितकेच जबाबदार आहेत. मॉरिसवर दाखल करण्यात आलेली गुन्हेगारी केसेस राजकीय हेतूने प्रेरित होत्या. मॉरिसच्या शत्रूंनी षडयंत्र रचून त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवले होते. या गोष्टी वगळता मॉरिसच्या विरोधात कोणताही गुन्हा नव्हता, असे सरिना यांनी सांगितले.
'मॉरिस प्रचंड दबावाखाली होता'
मॉरिस नोरोन्हा तुरुंगातून सुटल्यापासून प्रचंड दबावाखाली होता, असे त्याची पत्नी सरिना यांनी सांगितले. मॉरिसचं सामाजिक काम आणि बॅनर्सविषयी अनेकांनी आक्षेप घेतले होते. त्याला कार्यक्रम आयोजित करण्यासही मज्जाव करण्यात आला होता. त्याच्या शत्रूंनी अमेरिकन दुतावासाकडे पत्रं पाठवली होती. त्यामध्ये मॉरिस हा गुन्हेगार असल्याचे लिहले होते. परिणामी अमेरिकन दुतावासाकडून मॉरिसला समन्स पाठवण्यात आले होते. मॉरिसला जामीन मिळाल्यानंतर त्याला अमेरिकेला जायचे होते. मात्र, तुझ्यावरील गुन्हेगारी प्रकरणे निकाली निघाल्याशिवाय तुला अमेरिकेला जाता येणार नाही, असे दुतावासाकडून सांगण्यात आले होते. मॉरिसला त्याच्या उपजीविकेसाठीही पैसे कमावता येऊ नयेत, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मी मॉरिसला इतक्या तणावात कधीच पाहिले नव्हते. मॉरिस बहुतेकवेळा मला त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टींविषयी सांगायचा. त्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवायची भाषा मॉरिस अनेकदा करायचा. पण गोष्टी या थराला जातील, असे मला कधीच वाटले नव्हते. तो झुकला नाही, असे सरीना यांनी म्हटले.
सरीना यांचा नवा गौप्यस्फोट
सरीना यांनी आपल्या मुलाखतीमध्ये अनेक नव्या गोष्टी उघड केल्या. मॉरिसच्या शत्रूंनी त्याला पैशांचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने नकार दिला. जेव्हा कोणीतरी त्याच्याविरोधातील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याचा आणि नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रस्ताव ठेवला, जुने वाद बाजूला ठेवले. या समझोत्यानंतर मॉरिसच्या शत्रूंनी संबंधित महिलेला बलात्काराचे प्रकरण पुन्हा उकरुन काढण्यास उद्युक्त केले, असे सरीना यांनी सांगितले.
सरीना यांना गोळीबाराची घटना नेमकी कशी कळाली?
सरीना यांनी सांगितले की, मी ऑफिसमध्ये असताना मला आईचा फोन आला. तिने मला अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे सांगितले. त्यावर मी काही बोलले नाही. थोड्यावेळाने मला एका मित्राने फोन करुन सांगितले की, अभिषेकवर गोळीबार करणारा मॉरिस होता. तेव्हा मला विश्वासच बसला नाही. त्यानंतर आणखी एकाने मला मॉरिसनेच अभिषेकवर गोळ्या झाडल्याचे सांगितले. ते ऐकून मला खूपच धक्का बसला. तेव्हा माझी मुलगी एकटीच घरी होती. मी आईला तातडीने तिच्याकडे पाठवले. माझ्या मुलीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे या घटनेबद्दल कळाले. सोशल मीडियावर मॉरिस गुंड असल्याचे सांगितले जात आहे. पण हे खरे नाही. माझ्या मुलीला या सगळ्यामुळे खूप त्रास झाला. तिने अन्नपाणी सोडले आहे, आपले वडील परत येतील, अशी आशा तिला वाटते.
मॉरिसचे अंत्यसंस्कार महालक्ष्मीच्या दफनभूमीत का झाले?
दहिसरच्या चर्चमध्ये मॉरिसचे पार्थिव दफन करण्याची परवानगी नाकारल्याचे वृत्ताचे सरीना यांनी खंडन केले. मॉरिस आणि त्याच्या कुटुंबीयांचे बालपण धोबी तलाव परिसरात गेले होते. त्याची आई, वडील, भाऊ या सगळ्यांना महालक्ष्मी येथील दफनभूमीत दफन करण्यात आले होते. त्यामुळेच मॉरिसला तिकडे दफन करण्यात आले. दहिसरमधील चर्चच्या फादरनी स्वत: त्याठिकाणी येऊन सर्व विधी केले, असे सरीना यांनी सांगितले.