मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करणारा मॉरिस नोरोन्हाचा मृतदेह दहिसर येथील चर्चमध्ये दफन करण्यावरुन निर्माण झालेला वाद आता मिटला आहे. दहिसरच्या लेडी ऑफ द इमॅक्युलेट कँसेप्शन चर्चचे प्रमुख असलेल्या फादर जेरी यांनी मॉरिसचा मृतदेह येथील दफनभूमीत दफन करण्याची परवानगी दिली आहे. दुसऱ्याची हत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह इथे दफन केला जाऊ नये, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली होती. त्यामुळे मॉरिस नोरोन्हाचा मृतदेह कुठे दफन करायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, फादर जेरी यांनी दहिसर येथील चर्चमध्येच मॉरिसचा मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली आहे. अन्यथा  मॉरिसच्या मृतदेहावर गोराई येथील सार्वजनिक दफनभूमीत अंत्यसंस्कार करावे लागले असते. 


तर दुसरीकडे अभिषेक घोसाळकर यांच्यावरही बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बोरिवली येथील औंदुबर या निवासस्थानी अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही याठिकाणी येऊन विनोद घोसाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अभिषेक घोसाळकर यांना निरोप देताना त्यांचे कुटुंबीय आणि शिवसैनिक भावूक झाले होते. थोड्याचवेळात अभिषेक यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात येईल. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सध्या या प्रकरणाचा वेगवान तपास सुरु आहे. कालच्या घटनेनंतर मॉरिस नोरोन्हा यांची पत्नी आणि त्यांचा अंगरक्षक मिश्रा यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान मॉरिसने मिश्रा याच्या परवानाधारक पिस्तुलमधून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे.


अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये नेमका काय वाद?


अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. जुन्या रागातून मॉरिसने घोसाळकर यांच्या हत्येचा कट रचला. मॉरिसला एका बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला. तो सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. तो घरात असताना अनेकदा 'मी अभिषेकला सोडणार नाही, संपवणारच', असे बोलायचा. मॉरिसच्या पत्नीने ही माहिती पोलिसांना दिली. मॉरिसने गुरुवारी अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमासाठी दहिसरमध्ये बोलावले होते. याठिकाणी दोघांनी मिळून फेसबुक लाईव्ह करत आपल्यातील वाद संपल्याचे जाहीर केले. मात्र, फेसबुक लाईव्ह संपताच मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या.


आणखी वाचा


अभिषेक घोसाळकर हत्याकांडाचा 'ट्रिगर पॉईंट', मॉरिसने टोकाचं पाऊल का उचललं? हत्येमागची इनसाईड स्टोरी


कट्टर शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंकडून अखेरचा निरोप, ठाकरे कुटुंबीयांनी घेतली घोसाळकरांची भेट