मुंबई : महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. हा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पाणी फाऊंडेशन काम करत असून, आमची योजना यशस्वी झाल्यास महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा हटेल, असा विश्वास अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. लातुरात पाणी टंचाई इतकी भीषण आहे की ट्रेनने पाणी पुरवण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारसह अनेक सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्ती आपापल्या परीने दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुरु केला आहे. याच निमित्ताने अभिनेता आमीर खान आणि सिनेदिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी आज ‘माझाकट्टा’वरुन संवाद साधला.
“मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा”
देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे. मात्र, दुष्काळ निवारणाची सुरुवात महाराष्ट्रातूनच का केली, असा प्रश्न ज्यावेळी आमीरला विचारला गेला, त्यावेळी आमीर म्हणाला, “मी महाराष्ट्राचा आहे. शिवाय, महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्यातील तीन तालुक्यांपासून पाणी फाऊंडेशनने आपलं काम सुरु केलं आहे.”
“गावा-गावात जाऊन श्रमदान करणार”
पाणी फाऊंडेशनचं काम हे श्रमदानावर अधारित असून, लोकांचा सहभाग आवश्यक आहे. मी स्वत: काही दिवसांनी श्रमदान करणार आहे, असेही यावेळी अभिनेता आमीर खान म्हणाला.
‘वॉटर कप’ स्पर्धा काय आहे?
महाराष्ट्रातील तीन तालुक्यांमधील 150 गावं या स्पर्धेत सहभागी आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका, असे हे तीन तालुके आहेत. 5 जूनपर्यंत या तीन तालुक्यांमधी जो कुणी जलसंधारणाचे सर्वोत्कृष्ट उपचार राबवेल, तो तालुका विजेता असेल. ‘पाणी अडवणे, पाणी साठवणे’ अशी संकल्पना या स्पर्धेची आहे. यातील विजेत्यांना पहिल्या क्रमांकासाठी 50 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासठी 30 लाख रुपये, तर तिसऱ्या क्रमांकासाठी 20 लाख रुपये बक्षीस असेल.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’पेक्षा ‘माती अडवा, पाणी जिरवा’ घोषणा हवी!
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या घोषणेऐवजी ‘माती अडवा, पाणी जिरवा’ अशी घोषणा हवी. कारण पावसाळ्यात माती वाहून जाता कामा नये. ती योग्यप्रकारे अडवून त्यात पाणी जिरवण्याची गरज आहे, असे सत्यजीत भटकळ म्हणाले.