मुंबई : आज व्हॅलेंटाईन डे आहे. या प्रेमाच्या अनोख्या मुहूर्तावर आपल्या प्रेमाप्रती आदरभाव तसंच उत्कट प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी तरुणाईच्या गळ्यातलं ताईत असलेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचं नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला. यावेळी त्यांनी अगदी खळखळून हसत प्रसंगी लाजत उत्तरं दिली. आदित्य ठाकरे यांना आपल्या कामाच्या 'दिशा' काय आहेत? या विषयी अनेकदा विचारलं गेलं आहे. त्यावेळी त्यांनी अशीच भन्नाट उत्तरं देऊन वेळ मारून नेली आहे.

व्हेलेंटाईन डे बाबत त्यांना 'आज व्हेलेंटाईन डे आहे. आपल्यासोबत तरुणींच्या गळ्यातले ताईत आहेत' असं माझाच्या प्रतिनिधींनी विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्ही ताईत बोललात की ताई बोललात, यावर एकच हशा पिकला. ते म्हणाले की, सकाळपासून मी शाळेची उद्घाटनं करत फिरतोय. इतरही खूप कार्यक्रम आहेत. ते म्हणाले की, 'माझं वर्कआऊट थांबलंय. मंत्रालयातच खूप वरखाली होतं.'

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रत्येक दिवशी मी शिक्षण आरोग्य याविषयावरच काम करतोय. यावेळी पुढच्या प्रश्नाचा रोख ओळखत ते मिश्किलपणे म्हणाले की, 'मला माहित आहे आता तुमच्या पुढच्या प्रश्नांची दिशा काय असणार आहे'.

यावेळी त्यांना 'पर्यावरण, पर्यटनाच्या कामातून पुढची दिशा मिळणार आहे का?' असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की, मी तुमची एकदा भेट करून देणार आहे. अवघड प्रश्न काढू नका, मला महाराष्ट्राचं काम आधी करु द्या, असं ते मिश्किलपणे म्हणाले. 'निवडणुकीच्या आपण सांगितलं होतं आधी लगीन कोंढाण्याचं, आता निवडणूक संपली आहे' असं त्यांना विचारले असता आदित्य ठाकरे क्षणभर लाजले. ते म्हणाले की, घरी हा प्रश्न विचारु नका. मी तुमच्याच मतदारसंघातला आमदार आहे. तुमची भेट करुन देतो. लग्नं वगैरे जमलं तर तुमच्याकडे येऊ शकणार नाही, मला महाराष्ट्राचं काम करायचं आहे, असंही ते म्हणाले.

अवधूत गुप्ते म्हणाले आदित्यजी हे उत्तर न 'पटनी', आदित्य म्हणाले तुमची 'दिशा' चुकली 


नुकतंच संगमनेरमध्ये मेधा महोत्सवात अवधूत गुप्तेनं आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनीही मिश्किल उत्तर दिलं होतं. आदित्य ठाकरेंना अवधूत गुप्ते यांनी रश्मी वहिनींनी किती वर्ष जबाबदारी घ्यायची? असं विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून माझी जबाबदारी आईंने मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे असं उत्तर दिलं होतं. यावर अवधून गुप्ते यांनी पण आम्हाला बातम्यांमध्ये काहीतरी दिसत असतं…आपका उत्तर हमको 'पटनी' चाहिये ? म्हणत अप्रत्यक्षपणे दिशा पटानीचा उल्लेख केला. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं.