Aaditya Thackeray on MNS : मशिदीवरील भोंग्यांना विरोध करण्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतल्यानंतर मनसेनं आज शिवसेनेला डिवचलं होतं. त्यामुळे या मुद्यावर शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) असा सामना सुरु झाल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळालं होतं. मनसेनं आज शिवसेनाभवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिका ऐकवली. रामनवमीचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेवर कुरघोडी केली. त्यानंतर पोलिसांनी भोंगा जप्त केला आणि मनसैनिकांना ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसेला खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. 


काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरींना भोंग्यांना टार्गेट करत हनुमान चालिसा पठन करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. तेव्हापासूनच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी हिंदुत्वावरुन शिवसेनेवरही निशाणा साधला होता. तेव्हापासूनच मनसे आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच आज रामनवमी निमित्त मनसेनं शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठणाचा घाट घातला होता. तसेच, हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया मनसेच्या वतीनं देण्यात आली होती. यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी मनसेला खोचक टोला लगावला आहे. 


दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेचं  शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं. शिवसेनाभवनासमोर टॅक्सीवर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा म्हटल्यानं मनसेचे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं गेलं. एवढंच नाहीतर पोलिसांकडून भोंगाही जप्त करण्यात आला होता. या सगळ्यांना शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं. यावेळी या पोलीस स्टेशनखाली असलेल्या हनुमान मंदिरात मनसैनिकांनी हनुमान चालिसा पठण केलं. 


पाहा व्हिडीओ : संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, आदित्य ठाकरेंचा मनसेला खोचक टोला



काय म्हणाले होते राज ठाकरे?


''प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारने घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महविकास आघाडी सरकारला दिला होता. 


"माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. सकाळी पाच वाजल्यापासून त्रास होतो. कोणत्या धर्मात लाऊडस्पीकर लिहिलं आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांमध्ये बघा. कुठेही तुम्हाला लाऊडस्पीकर दिसणार नाही. तुमच्या परमेश्वरांशी प्रार्थना करायची असल्यास करा, मात्र घरात.", असं ते म्हणाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :