Uddhav Thackeray Birthday : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला येणार आहेत. कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. तसंच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडानंतर हे एकप्रकारे शक्तिप्रदर्शन असणार आहे.


हारतुरे, पुष्पगुच्छ नको, फक्त शुभेच्छा द्या; उद्धव ठाकरे यांचं आवाहन 
शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. दरवर्षी 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांसह सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर 'मातोश्री' निवासस्थानी येतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी 'मातोश्री'बाहेर रांगा लागतात. पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाली, फोटोफ्रेम्सच्या रुपात शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो. तुमच्या शुभेच्छा निश्चितच स्वीकारेन, तो शिवसैनिकांचा अधिकारच आहे. पण कृपया पुष्पगुच्छ वगैरे काही आणू नका, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.


नव्याने पक्षबांधणी करण्याचं आवाहन
एकनाथ शिंदे गटाची बंडखोरी, आमदार, खासदारांसह नगरसेवक,पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहेत. एकीकडे एक-एक जण उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना दुसरीकडे खरी शिवसेना कोणती यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. त्यातच नव्याने पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नव्याने उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात ते राज्याचा दौरा करणार आहेत.


शिवसेनेतील फुटीचा असाही परिणाम
शिवसेनेतील फुटीचा परिणाम यंदा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तील जाहिरातींवर झाला आहे. सामना दैनिकात यंदा जाहिरातीसाठी चढाओढ पाहायला मिळत नाही. यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये प्रचंड घट झाली. त्यामुळे दरवर्षी याच दिवशी मिळणाऱ्या उत्पन्नातही घट होणार आहे. प्रमुख नेते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार देखील शिंदे गटात सहभागी झाल्याने 'सामना'मध्ये जाहिराती देणार कोण असाही सवाल विचारला जात आहे.


संवेदनशील राजकारणी ते ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप



  • उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी झाला.

  • शालेय शिक्षणानंतर त्यांनी पदवीचं शिक्षण मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून पूर्ण केलं

  • पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ही दोन मुले असा त्यांचा परिवार आहे

  • उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीची आवड आहे. त्यांना राजकारणापेक्षा फोटोग्राफीत रस असल्याचं निकटवर्तीय सांगतात

  • उद्धव ठाकरेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी दशेपासून झाली

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2002 मध्ये उद्धव ठाकरेंकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती.

  • त्यानंतर 2003 मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले

  • 2004 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव यांना उत्तराधिकारी जाहीर केलं

  • शिवसेनेचा राज्यात विस्तार करण्यात उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली

  • कोणतीही निवडणूक न लढवता मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे राज्याचे पहिले नेते ठरले

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

  • 18 मे 2020 रोजी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली

  • 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 असा अडीच वर्षांचा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ होता

  • आपल्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीदरम्यान केलेल्या कामाची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली

  • शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. फ्लोअर टेस्टच्या आधीच उद्धव ठाकरेंनी 29 जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने सरकार कोसळलं

  • आता शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याचं आव्हान उद्धव यांच्यासमोर आहे.