कल्याण : कल्याणच्या कोळसेवाडी भागात दोन तरुण आणि एका तरुणीला जमावानं बेदम मारहाण केली आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली. संबंधित तरुणी रात्री रिक्षानं प्रवास करत होती. त्यावेळी रिक्षआचालकानं तिला छेडण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित तरुणीनं फोन करुन आपल्या मित्रांना बोलावलं. मात्र त्यावेळी रिक्षाचालक आणि गावकऱ्यांनी तरुणी आणि तिच्या मित्रांना बेदम मारहाण केली. परंतु, अद्याप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. 


कल्याण कोळसेवाडी विभागात दोन तरुण आणि एक तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत. ते उल्हासनगर विभागात राहतात. मध्यरात्री त्यांची एक मैत्रीण रिक्षाने प्रवास करत असताना चालक तिची छेडछाड करु लागला. तिने फोनवरुन याची माहिती तिच्या मित्रांना दिली. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले. मात्र या ठिकाणी आल्यावर रिक्षाचालक आणि गावातील लोकांनी या तरुणांना बेदम मारहाण केली. अगदी पट्ट्याने त्यांना मारहाण करण्यात आली. एवढेच काय तर या तरुणीलाही बेदम मारहाण करण्यात आली. मात्र या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नसून मारहाण झालेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे तरुण अजून ही पोलीस ठाण्यात दाखल आहेत. 


दरम्यान, ही घटना ज्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली ते प्रत्यक्षदर्शी गुलाम मकबूल यांनी याबाबत एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे. तर या तरुणांच्या मित्राने नेमके काय घडले, यासंदर्भात माध्यमांना सांगितलं आहे.


पाहा व्हिडीओ : कल्याणमधील कोळसेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण



अत्यंत अस्वस्थ करणारी घटना : निलम गोऱ्हे


शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली, त्या म्हणाल्या की, "अत्यंत अस्वस्थ करणारी घटना आहे. एकप्रकारचा दबंगपणा समाजामध्ये दिसत आहे. याप्रकरणात आपण विचार करु शकतो की, समजा ही मुलं या मुलीच्या रिक्षाच्या मागोमाग नसती, तर त्या मुलीची परिस्थिती काय झाली असती? यापूर्वी ठाण्यात अशा प्रकरणामुळे महिला दगावलेल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच मी कोकण महासंचालकांना पत्र देऊन ठाणे, ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर या सर्व भागांतील महिलांच्या प्रवासासंदर्भात लक्ष वेधून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी अद्याप गुन्हा का दाखल केलेला नाही?, त्या मुलीची तक्रार का घेतली नाही? मी स्वतः यासंदर्भात पोलीस महासंचालकांशी बोलणार आहे. एबीपी माझाचे आभार मानते की, या घटनेकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे." 


अतिशय संतापजनक घटना : चित्रा वाघ 


"अतिशय संतापजनक घटना आहे ही. जर आपण पाहिलं तर याप्रकरणात मुलीची छेड रिक्षाचालकाकडून काढण्यात आली आणि तिनं ज्यांना मदतीसाठी बोलावलं, त्या मुलांनाही मारहाण करण्यात आली. यामध्ये पोलिसांची कारवाई पाहिली तर, ज्यांनी मारलं ते अद्याप मोकाटच आहे, पण जे वाचवायला आले, त्यांना मात्र पोलीस स्थानकात बसवून ठेवलं आहे. असा अजब कारभार पोलीस दलाचा पाहायला मिळतोय. याआधीही ठाण्यात चालत्या रिक्षातून उद्या मारण्याच्या घटना घडल्या आहेत. नियम, कायदे बनवले जातात, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होताना दिसत नाही. हे पाहण कोणत्या विभागाचं काम आहे. ते कोण आणि कधी करणार आहे?", अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :