भिवंडी : शहरातील कसाई वाडा या ठिकाणी आरोपीस पकडण्यासाठी वापी गुजरात येथुन आलेल्या पोलिसांसोबत झटापटीत चौथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीत घडली आहे. जमिल कुरेशी उर्फ जमील टकला (वय 38) असे मृत आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमा झाल्याने तणाव निर्माण होऊन पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत नागरिकांनी झटपट करीत धक्काबुक्की केली. त्यानंतर अधिक पोलीस कुमक मागवून जमावास शांत करून पांगविण्यात आले आहे.


भिवंडी कसाई वाडा येथे राहणार जमील कुरेशी हा गोवंश चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहे. त्या विरोधात वापी गुजरात येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गुजरात पोलिसांचे पथक भिवंडी येथे आले होते. हे पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत कसाई वाडा येथे आरोपीस पकडण्यास गेले असता आरोपी आपल्या चौथ्या मजल्यावरील घरात लपून बसला होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटपट होऊन खिडकीतून त्याचा तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळला, ज्यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला.


या घटनेनंतर परिसरात मोठा जमाव घटनास्थळी जमा होऊन त्यांनी गुजरात व गुन्हे शाखेच्या पोलिसांना अडवून त्यांनी जमील कुरेशी यास खिडकीतून ढकलून दिले असा आरोप केला. यावेळी वाद घालत त्यांनी पोलिसांसोबत धक्काबुक्की केली. तर आज शुक्रवारच्या नमाज नंतर जमील कुरेशी हा घरात जेवत असताना गुजरात पोलीस थेट त्याच्या घरात घुसून त्यास ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची आरोप मृत जमील कुरेशीची वहिनी अनिसा कुरेशी यांनी केला आहे.


या घडामोडीनंतर स्थानिक निजामपुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अधिक पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी आले. जमा झालेला जमावला शांत करत नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवण्यात आला. यानंतर दोन्ही ठिकाणी मोठी पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण व सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल होत तेथेही जमा झालेला जमाव पांगविण्यात आला आहे. गुजरात पोलिसांनी परस्पर गुन्हे शाखेच्या पोलिसांसोबत सदरची कारवाई स्थानिक निजमपुरा पोलिसांना न कळविताच करण्याचे धाडस केले व त्यानंतर पोलीस कारवाई बाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान याबाबत योग्य ती माहिती घेऊन जे दोषी असतील त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. सध्या परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात आल्याचे सांगितले.