मुंबई : मुंबईतल्या फोर्ट भागातील नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव्ह बँकेत मती गुंग करणारा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या बँकेत चक्क शिपायाला बँकेचं संचालकपद दिलं आहे, तर अध्यक्ष असणाऱ्या महिलेला आपल्याकडे कुठल्या बँकेचे अध्यक्षपद आहे, हे माहितही नव्हतं.

बदलापूरमध्ये एका चाळीत राहणाऱ्या अमिता महाजन यांची लोकलमध्ये 'नीड्स ऑफ लाईफ बँके'च्या सीईओ मनिषा जाधव यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी जाधवनं महाजन यांना दरमहिना 1 हजार रुपये देण्याच्या कबुलीवर काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या.

गीता शिवदासानी या बँक ग्राहकानं जेव्हा त्यांचं लोन राष्ट्रीयकृत बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी प्रयत्न केले, तेव्हा त्यांना बँक खात्याची कोणतीही कागदपत्रं देण्यात आली नाहीत. तसंच बँकेच्या आवारातही प्रवेश करण्यास मनाई केल्यानंतर शिवदासानी यांनी पोलिसात धाव घेतली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

नेत्रा सिंग रावत या शिपायाला संचालक करण्यात आल्याचा दावा बँकेच्या ऑडिटरनं पोलिस चौकशीत केला. तसंच शिपायाला कोणतीही कल्पना नसताना त्याच्या नावावर चक्क 25 लाखांचं लोनही पास करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात बँकेच्या सीईओ मनिषा जाधवशी संपर्क साधला असता अमिता महाजनविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं त्यांनी स्वतः राजीनामा दिल्याचा दावा केला.

बँकेत कोणतेही गैरव्यवहार चालत नसल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. बँकेचा उपाध्यक्ष घनशानी आणि सीईओ मनिषा जाधव यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला असला तरी उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंत मुभा आहे.