मुंबई : मुंबईत मेट्रो 3 प्रकल्पाच्या बॅरिकेट्सना अज्ञातांनी काळे फासलं आहे. गिरगाव आणि काळबादेवी येथून जाणाऱ्या मेट्रोमार्गाच्या बॅरिकेट्सना काळं फासण्यात आलं आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ असा मेट्रो तीनचा मार्ग आहे.


काही दिवसांपूर्वीच मेट्रो तीन प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली, पण या प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. गिरगाव आणि काळबादेवी येथील मेट्रोच्या मार्गावर येणाऱ्या 115 कुटुंब आणि 257 व्यापारी गाळ्यांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे. पण त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नं अजून सुटलेला नाही. असं असतानाही मेट्रोच्या कामाला सुरवात झाली. त्यामुळे मेट्रो तीनला विरोध दर्शवण्यासाठी हे काळं फासल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्रांनी काही दिवसांपूर्वीच मेट्रो 7 पर्यंतच्या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला होता. तसंच मेट्रो 3 प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांना सदनिका जाहीर करण्यात आल्या आहेत. गोवंडी आणि गौतम नगर परीसरात पुनर्वसन करण्यात येणार आहे. पण तरीही स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे.