मुंबई : सामन्य मुंबईकरांसह नोकरदार नेहमीच मुंबईतील वाहतूक कोंडीला सामोरं जातात. पण या कोंडीमुळे 30 ते 40 तरुण आणि तरुणींची थेट नोकरीची संधीच हुकली आहे. केंद्रावर उशिरा पोहोचल्याने परीक्षा देण्यास मज्जाव केल्याचा दावा या उमेदवारांनी केला आहे.


मुंबईतील पवई इथे न्यू इंडिया अश्यूरन्स असिस्टंट ऑफिसरच्या पदासाठी आज सकाळी 9.15 वाजता परीक्षा होती. पण नोकरीसाठी परीक्षा द्यायला आलेल्या उमेदवारांना सकाळच्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. जेव्हीएलआर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने जवळपास 30 ते 40 उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास पाच ते दहा मिनिटं उशीर झाला. या कारणावरुन परीक्षा देण्यास मज्जाव केल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे.



आयबीपीएस म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेमार्फत ही परीक्षा घेतली जात होती. मात्र उशिर झाल्याने आम्हाला गेटच्या आत घेतलं नाही, अशी तक्रार या उमेदवारांनी केली आहे. या प्रकारामुळे सुमारे 30 ते 40 तरुण आणि तरुणींची थेट नोकरीची संधीच हुकली आहे