मुंबई : पाकिस्तानचे प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. फेमा (FEMA) कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. राहत फतेह अली खान यांच्यावर भारतात विदेशी चलनाच्या तस्करीचा आरोप आहे. ईडीने राहत फतेह अली खान यांच्याकडून उत्तर मागितलं आहे.


राहत फतेह अली खान यांनी अवैधरित्या 3 लाख 40 हजार यूएस डॉलर कमावले आहेत. त्यांनी त्यापैकी 2 लाख 25 हजार डॉलरची तस्करी केल्याचं म्हटलं जात आहे. जर त्यांच्या उत्तराने ईडीचं समाधान झालं नाही तर तस्करी केलेल्या रकमेवर 300 टक्के दंड द्यावा लागणार आहे. तसंच दंड न भरल्यास त्यांना लुकआऊट नोटीस बजावली जाईल. सोबतच भारतात त्यांच्या कार्यक्रमांवर बंदीही घातली जाऊ शकते.

याआधी 2011 मध्ये राहत फतेह अली खान यांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वा लाख डॉलरसोबत पकडलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे या रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज नव्हते. त्यामुळे राहत फतेह अली खान यांच्यासह त्यांच्या मॅनेजरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

राहत फतेह अली खान यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. सुफियाना अंदाजात त्यांनी गायलेली रोमॅन्टिक गाणी कानसेनांना भुरळ पाडतात. भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असूनही अनेक बॉलिवूड दिग्दर्शक राहत फतेह अली खान यांना आपल्या चित्रपटांसाठी गायला सांगतात.