सातारा : मुंबईतील धारावीत एटीएम कॅश व्हॅन लुटीचा प्रकार घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुन्हे अन्वेषण विभागाने पहिली कारवाई केली आहे. सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोलनाक्यावरुन तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून 15 लाख 40 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
धारावीत एटीएम कॅश व्हॅन लुटीचा प्रकार घडल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासाची चक्र वेगाने फिरली. आरोपी ट्रॅव्हल्समधून बंगळुरुच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती मिळताच, सातारा पोलिसांनी सापळा रचला आणि आणेवाडी टोलनाक्यावरुन तिघांना ताब्यात घेतले.
एटीएम कॅश व्हॅन लुटीतील तिघांना अटक केली असली, तरी आणखी 9 जणांची नावं उघड झाली आहेत. या 9 जणांना अटक करण्यासाठी मुंबईहून गुन्हे अन्वेषण विभागाची टीम रात्रीच विमानानं बंगळुरुला रवाना झाली आहे. लुटीतील सर्व आरोपी तामिळनाडूतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीत एका महिलेचाही समावेश आहे.
मुंबईतील धारावीत गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजता एसीबीआयच्या एटीएमची कॅश लुटल्यानं एकच खळबळ उडाली होती. सीसीटीव्हीत 2 तरुण पैशांची पेटी घेऊन जाताना दिसत आहेत. सुमारे दीड कोटींची रोकड चोरट्यांनी पळवली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या लुटीमुळे सुरक्षेचे अक्षरश: तीनतेरा वाजल्याची टीका झाली.