मुंबई : जर तुम्ही पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवास करणारे प्रवासी असाल तर तुमच्यासाठी पाच नोव्हेंबर पर्यंत डोकेदुखी वाढवणारी ही बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वे वरील तब्बल 2700 पेक्षा जास्त लोकल (Local) 26 ऑक्टोबर पासून ते पाच नोव्हेंबरच्या काळात रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील खार आणि गोरेगाव दरम्यान दरम्यान 8.8 किमीची सहावी मार्गिका सुरु करण्यासाठी मुख्य जोडकाम 27 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तसेच 5 नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरु राहील. यामुळे दररोज 300 पेक्षा जास्त अधिक सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत.
तसेच 300 पेक्षा जास्त लोकल या विलंबाने धावतील. यामुळे पुढील आठवडा रेल्वे प्रवाशांची परीक्षा पाहणारा असणार असल्याचं सांगण्यात येतय. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार/डहाणू रोडदरम्यान दररोज 1383 लोकल फेऱ्या धावतात. या लोकलमधून दररोज 20 ते 30 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र लोकल आणि मेल एक्सप्रेस साठी वेगवेगळ्या मार्गिका करण्याच्या प्रकल्पांतर्गत काम करण्यात येणार आहे. सहाव्या मार्गिकेचे हे काम असणार आहे. 26 - 27 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल. यामुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्या रद्द होणार आहेत.
'या' तारखेला असणार जम्बो मेगाब्लॉक
चार आणि पाच तारखेला म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडून 24 तासांचा एक जम्बो मेगाब्लॉक देखील घेण्यात येईल. त्यामुळे पाच तारखेपर्यंत पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेकडून माहिती देण्यात आलीये.
वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द
27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान रोज नऊ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. यामुळे वातानुकूलित लोकल प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. 1 नोव्हेंबरपासून वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच एसी लोकलच्या तिकीट-पासवर साध्या लोकलच्या प्रथम श्रेणीतून प्रवास करण्याची मुभा प्रवाश्यांना देण्यात आलीये.
पश्चिम रेल्वेवरील रद्द होणाऱ्या लोकल
दिनांक | वार | अप | डाऊन | एकूण रद्द | एकूण विलंबने |
27-10-2023 | शुक्रवार | 129 | 127 | 256 | 250 |
28-10-2023 | शनिवार | 129 | 127 | 256 | 250 |
29-10-2023 | रविवार | 116 | 114 | 230 | 200 |
30-10-2023 | सोमवार | 158 | 158 | 316 | 200 |
31-10-2023 | मंगळवार | 158 | 158 | 316 | 200 |
01-11-2023 | बुधवार | 158 | 158 | 316 | 00 |
02-11-2023 | गुरुवार | 158 | 158 | 316 | 50 |
03-11-2023 | शुक्रवार | 158 | 158 | 316 | 50 |
04-11-2023 | शनिवार | 46 | 47 | 93 | 50 |
05-11-2023 | रविवार | 54 | 46 | 110 | 50 |
त्यामुळे या कालावधीमध्ये रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रवाश्यांच्या गैरसोयीसाठी रेल्वेकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलीये. दरम्यान मेल एक्सप्रेस प्रमाणे लोकल सेवांवर देखील या ब्लॉकचा परिणाम होणार असल्यामुळे चाकमान्यांना देखील मोठ्या त्रासाला समोरे जावे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.