मुंबई : लोकलच्या ट्रॅकशेजारी काठी मारुन मोबाईल चोरण्याच्या प्रकारामुळे एका तरुणीच्या आयुष्याला मात्र ब्रेक लागला आहे. मोबाईल चोरामुळे 23 वर्षीय तरुणीला आपला एक पाय आणि हाताची काही बोटं गमवावी लागल्याची घटना मुंबईच्या सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन चोराला अटकही करण्यात आली आहे.


कल्याणमध्ये राहणारी द्रविता सिंग ही 23 वर्षाची तरुणी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी लोकलने सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. त्यावेळी सॅण्डहर्स्ट रोड स्थानक सोडताच तिला फोन आला. मोबाईलवर बोलण्यासाठी ती लोकलच्या दरवाजावर गेली. ती फोनवर बोलत असतानाच अचानक तिच्या डोक्यावर बांबूचा जोरदार फटका बसला. त्यामुळे द्रविता थेट लोकलमधून खाली पडली.



ती ट्रॅकमध्ये पडताच आरोपीनं तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला. पण द्रविता ट्रॅकमध्ये पडलेली असताना दुसऱ्या लोकलनं तिला धडक दिली. या अपघातात तिला आपला एक पाय आणि हाताची काही बोटं गमवावी लागली. या संपूर्ण प्रकरणाचा  द्रविताला प्रचंड धक्का बसला असून ती अद्यापही त्यातून सावरलेली नाही.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचत अल्पवयीन मोबाईल चोराला अटक केली. त्याने द्रविताचा फोन चोरुन तो जवळच्याच झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला विकला होता. पोलिसांनी या महिलेला देखील अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस आणखी कसून तपास करत आहेत.