मुंबई : देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. एक संकट दूर होत असताना आता तिसर्या लाटेच्या धोक्याबाबतही शक्यता वर्तवली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात दिसू शकते. यासह, काही तज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे. या दरम्यान मुंबईतील आगरी पाड्यातील सेंट जोसेफ आश्रमातील 22 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील तिस-या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार हा इशारा खरा ठरणार का? असा सवाल उपस्थित आहे.
मुंबईतील आगरी पाड्यातील सेंट जोसेफ आश्रमातील 22 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. सेंट जोसेफ आश्रमातील 12 वर्षांखालील 18 मुलांना कोरोनाची लागण झाली असून सगळ्याच मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मुंबई महापालिकेकडून आश्रमाचा परिसर सील करण्यात आला आहे. सेंट जोसेफ अनाथ आश्रम आता पालिकेकडून सील करण्यात आले आहे.
12 वर्षाखालील चार मुलांना नायर रुग्णालयाच्या पेडियाट्रिक वॉर्ड मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आला आहे. तर 12 वर्षावरील मुलांना रिचर्डसन अँड क्रुडस येथे कोरोना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. अनाथाश्रमात कोरोना रुग्ण आढळत असताना तिथे कॅम्प घेण्यात आला. 95 लोकांच्या टेस्ट करण्यात आला आणि त्यातील 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
भारतात दोन आठवड्यांत जायडस कॅडिलाच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. ही लस 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी 67 टक्क्यांपर्यंत परिणामकारक आहे. जायडस कॅडिलाची कोरोना लशीची 12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांवर चाचणी झाली आहे. आता लवकरच या लसीला डीसीजीआय परवानगी मिळण्याची आशा आहे. ही माहिती नीति आयोगाच्या आरोग्य सदस्य डॉ. पॉल यांनी दिली आहे.
जायडस कॅडिलाची कोरोना लस जायकोव डी (Zycov D) ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. कॅडिलानं कोरोना लशीसाठी सीडीएससीओ म्हणजेच, सेंट्रल ड्रग स्टँण्डर्ड कंट्रोल आर्गेनायजेशनकडे आपातकालीन वापरासाठी मंजूरी मागितली आहे. कंपनीनं जवळपास 28 हजार लोकांवर चाचणी पूर्ण केल्यानंतर इमरजेंसी यूज ऑथरायजेशन म्हणजेच, आपातकालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. कंपनीच्या अर्जावर सीडीएससीओकडून डाटा अॅनालिसिस केलं जात आहे. कंपनीच्या वतीनं वॅक्सिन ट्रायलचा सर्व डाटा देण्यात आला आहे.