Mumbai Bombings 13 July 2011 : मुंबई (Mumbai) म्हणजे, मायानगरी... ही मायानगरी अनेकांची स्वप्न पूर्ण करते अन् अनेकांना स्वप्न दाखवते. आतापर्यंत मुंबईनं अनेक धक्के सहन केलेत. मग तो दहशतवादी हल्ला असो वा बॉम्बस्फोट... मुंबईच्या आयुष्यात आलेला असाच एक काळा दिवस म्हणजे, 13 जुलै 2011. एखाद्या साधारण दिवसासारखाच हा दिवस उगवला. मुंबई घडाळ्याच्या काट्यावर धावू लागली. शहरात सर्व व्यवहार सुरुळीत सुरु होते. दिवसभरात अनेक उलाढाली झाल्या. पण संध्याकाळी अचनाक होत्याचं नव्हतं झालं. कोणी विचारही केला नसेल अशी घटना क्षणार्धात घडली. वेळ होती संध्याकाळाची 6 वाजून 54 मिनिटं ते 7 वाजून 6 मिनिटांपर्यंत मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्बस्फोट झाले. एकूण तीन ठिकाणी हे स्फोट झाले. एक ओपेरा हाऊस, दुसरं झवेरी बाजार आणि तिसरं ठिकाण दादर. ही तिनही ठिकाणं मुंबईतील नेहमीच गजबजलेल्या ठिकाणांपैकी एक. या बॉम्बस्फोटात 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर तब्बल 130 जण जखमी झाले होते. 


पहिला स्फोट : झवेरी बाजार 


झवेरी बाजार म्हणजे, मुंबईतील महत्त्वाच्या शहरांपैकी एक. येथे सोन्या-चांदीची अनेक मोठी दुकानं आहेत. इथून अनेक मोठ्या उलाढाली होतात. त्या दिवशीही सर्वकाही सुरळीत सुरु होतं. त्या दिवशीच्या संध्याकाळी एवढी भीषण घटना घडणार होती, याचा कोणी साधा विचारही केला नव्हता. संध्याकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला. झवेरी बाजारातील खाऊ गल्लीत पार्क करण्यात आलेल्या एका दुचाकीत हा बॉम्ब लावण्यात आला होता. 


दुसरा स्फोट : ओपेरा हाऊस 


झेवेरी बाजार पाठोपाठ अवघ्या एकाच मिनिटांत मुंबईला दुसरा हादरा बसला. चर्नी रोड येथील ओपेरा हाऊसमध्ये दुसरा स्फोट झाला. संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. ओपेरा हाऊसमधील प्रसाद चेंबर्स आणि पंचरत्न बिल्डिंगच्या बाहेर एक जेवणाच्या डब्ब्यात बॉम्ब ठेवण्यात आला होता. येथे हिऱ्यांशी निगडीत व्यवहार होतात. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी येथे तब्बल 5000-6000 लोक तिथे उपस्थित होती. 


तिसरा स्फोट : दादर 


झवेरी बाजार, ओपेरा हाऊस पाठोपाठ संध्याकाळी 7 वाजून 06 मिनिटांनी मुंबईत तिसरा बॉम्बस्फोट झाला. मुंबईतील सर्वात गजबजलेलं आणि महत्त्वाचं जक्शन असलेल्या दादरमध्ये. दादर रेल्वे स्टेशनपासून जवळ असणाऱ्या कबुतरखान्याजवळ एक शाळा आहे. त्या शाळेबाहेरील बेस्टच्या बसथांब्याच्या शेजारील विजेच्या खांब्यावर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. 


बॉम्बस्फोटानंतर मुंबई भितीचं वातावरण पसरलं. काही वेळासाठी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई जणू थांबलीच. दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूसह इतर महानगरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला. अनेक जखमी लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


एकापाठोपाठ एक झालेल्या तीन बॉम्बस्फोटांना गृह मंत्रालयानं दहशतवादी कृत्य म्हणून वर्गीकृत केलं आणि राष्ट्रीय तपास संस्थेचं (एनआयए) एक पथक बॉम्बच्या ठिकाणी पाठवलं. तपासात स्फोटांमध्ये अनेक आयईडी स्फोटकांचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं.


यंत्रणांकडून कसून तपास सुरु 


15 जुलै 2011 रोजी, 2008 च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटांच्या संदर्भात गुन्हे शाखेनं एका संशयिताला अटक केली होती. या संशयिताला भेटण्यासाठी एनआयएचं पथक अहमदाबादला गेलं होतं. 16 जुलै रोजी फॉरेन्सिकच्या अहवालानुसार, आत्मघाती बॉम्बरची शक्यता नाकारण्यात आली. 4 ऑगस्ट रोजी, गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्फोटांमध्ये देशांतर्गत दहशतवादी मॉड्यूलचा सहभाग असल्याचे संकेत दिले. 9 ऑगस्ट रोजी झवेरी बाजारात झालेल्या स्फोटात स्फोटक यंत्र बसवलेली दुचाकी चोरण्यात आली होती, असा दावा करणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटाच्या ठिकाणी कोणीतरी स्कूटर घेऊन पळत असल्याचं पाहायला मिळालं होतं.  


2012 मध्ये आरोपपत्र दाखल 


25 मे 2012 रोजी महाराष्ट्र एटीएसनं नकी अहमद, नदीम शेख, कंवर पाथरीजा आणि हारून नाईक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं, ज्यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय, इंडियन मुजाहिदीनचा मास्टरमाइंड यासीन भटकळ आणि इतर संशयितांसह इतर सहा जणांची आरोपपत्रात वाँटेड आरोपी म्हणून नावं आहेत. 4 फेब्रुवारी 2014 रोजी, 2011 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसला इंडियन मुजाहिदीनचा मास्टरमाइंड यासीन भटकळच्या ताब्यात देण्यात आलं. 16 जुलै रोजी मुंबई एटीएसनं अब्दुल मतीन फक्की याला गोव्यातील दाबोलिम विमानतळावरून अटक केली, जेव्हा तो दुबईहून विमानानं आला. इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासीन भटकळला हवालाच्या माध्यमातून पैसे देऊन दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्याचा आरोप त्याच्यावर होता.