मुंबई : मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुंबई मेट्रो हा भाजप-शिवसेना युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता.
भाजप-सेना सरकार सत्तेत असताना त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यावेळी आश्विनी भिडे यांची या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आली होती. पण 2019 साली महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भिडे यांची बदली करण्यात आली होती. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी आज काढलेल्या आदेशानुसार अश्विनी भिडे यांना मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याची सूचना करण्यात आली आहे.
आरे वसाहतीमधील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद झाले होते. आरे वसाहतीमध्ये मेट्रो-3 चे कारशेड उभारले जाणार आहे. परंतु पर्यावरणवादी आणि तिथल्या स्थानिकांनी त्यास विरोध केला होता. याचदरम्यान शिवसेना स्थानिकांच्या आणि पर्यावरणवाद्यांच्या बाजूने उभी राहिली. तर अश्विनी भिडे कारशेड आरे वसाहतीमध्ये बांधण्यावर ठाम होत्या. त्यावेळी शिवसेना आणि भिडे यांच्यात खटका उडाला होता. आता राज्यात शिंदे सरकार आले आहे. शिंदे सरकारकडून पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडेच कारभार सोपवण्यात आला आहे.
आश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील 24 वर्षांचा आहे. मुंबई मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना मुंबई मेट्रो वुमन म्हणून देखील ओळखले जाते.
संबंधित बातम्या :