मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेत मध्यान्ह भोजन योजनेत तब्बल 20 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं प्रशासनावर या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी केडीएमसीनं मे 2019 मध्ये संस्थांकडून निविदा मागवल्या होत्या. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या 23 पैकी 13 संस्थांना मध्यान्ह भोजन पुरवण्याचं काम देण्यात आलं. मात्र हे काम स्थानिक महिला बचतगट किंवा संस्थांना देणं नियमानुसार अपेक्षित असताना अक्षय पात्रा नावाच्या बाहेरील संस्थेला हे काम देण्यात आलं. हे काम देताना संस्थेचं केडीएमसी परिक्षेत्रात किचन आणि गोडाऊन असावं यासह अनेक अटी आणि नियम होते. मात्र सर्व नियम डावलत या संस्थेला काम देण्यात आल्याचा आरोप केडीएमसीतील सभागृह नेते, शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी केला आहे.


धक्कादायक बाब म्हणजे या संस्थेला काम देताना केडीएमसीनं जो ठराव केला, त्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या संस्थेला काम देण्यात येत असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हा ठेका देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या सगळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आता हा ठेका रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट सुवर्णा पावशे यांनी केली आहे. तर या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केडीएमसीचे विरोधी पक्षनेते आणि मनसे नगरसेवक प्रकाश भोईर यांनी केली आहे.


या सगळ्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या कामाबाबत तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाने अक्षय पात्रा संस्थेकडे ठेका दिलेल्या 10 हजार विद्यार्थ्यांपैकी 2 हजार विद्यार्थ्यांच्या जेवणाचं कंत्राट एका स्थानिक महिला बचतगटाला दिलं. मात्र त्यानंतरही यात काहीही भ्रष्टाचार झाला नसल्याचं केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांचं म्हणणं आहे. दरम्यान, जवळपास तीन वर्षांसाठी देण्यात आलेल्या या कंत्राटाची एकूण किंमत 20 कोटींच्या घरात जात असून या घोटाळा खरोखर झाला असेल, तर तो कुणाच्या 'निर्देशांवरुन' झाला? हे सखोल चौकशी करून समोर येणं आवश्यक आहे.


संबंधित बातम्या : 


दाऊदचा एकेकाळचा हस्तक एजाज लकडावाला अटकेत, मुंबई पोलिसांची कारवाई


SC, ST आरक्षणाला मुदतवाढीसाठी सुधारणा विधेयकास समर्थनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर


भविष्यात काहीही घडू शकतं, ठाकरे-फडणवीस भेटीवर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया