पाटणा : दाऊद इब्राहिमचा जवळचा गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसाच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावर लकडावालाला अटक केली. अटकेनंतर लकडावालाला न्यायालयाने 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 2003 मध्ये लकडावाला दाऊद इब्राहिम गँगच्या हल्ल्यात मारला गेल्याची अफवा पसरली होती. मात्र लकडावाला त्या हल्ल्यात थोडक्यात बचावला होता.


एजाज लकडावालाने छोटा राजनसोबत हातमिळवणी केल्याने दाऊद इब्राहिम नाराज होता. त्यामुळेच दाऊद इब्राहिमने त्यांच्यावर हल्ला केला होता. जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर लकडावाला बँकॉकहून कॅनडाला पळून गेला होता. त्यानंतर अनेक वर्ष तो तेथेच राहत होता. लकडावालाविरोधात मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी दोन डझनहून अधिक केसेस नोंद आहे. ज्यामध्ये हत्या, खंडणी, धमकावणे, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.





याआधी मुंबई विमानतळावर एजाज लकडावालाच्या मुलीला अटक करण्यात आली होती. लकडावालाच्या मुलीला बनावट पासपोर्टच्या मदतीने परदेशाचा पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली होती.


मुंबईत लकडावाला विरोधात 27 हून अधिक केसेस दाखल आहेत, तर 80 तक्रारी आल्या आहेत. सर्व केसेसचा तपास सुरु आहे. लकडावाला पाटण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. लकडावालाची मुलगी आधीच मुंबई पोलिसांच्या अटकेत असून तिच्याकडूनही आम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली आहे,  अशी माहिती मुंबई पोलीस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी दिली.