मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एआरसी याविरोधात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी 'गांधी शांती यात्रा' सुरु केली आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील या यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, शत्रुघ्न सिन्हा, आशिष देशमुख इत्यादी मोठे नेते उपस्थित होते.


केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशाचे विभाजन करणारा आहे. आम्ही पुन्हा एकदा महात्मा गांधी यांची हत्या होऊ देणार नाही, असं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं. 'गांधी शांती यात्रा' 21  दिवस चालणार आहे. मुंबईहून दिल्लीच्या दिशेने ही यात्रा जाणार आहे. मुंबईतून आज सुरु झालेली ही यात्रा 30 तारखेला दिल्ली पोहोचणार आहे. या यात्रेदरम्यान शेतकऱ्यांचा मुद्दाही उचलला जाणार आहे. देशाची खालावलेली अर्थव्यवस्थेबाबत सरकारला प्रश्नही विचारले जाणार आहे.





नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशाच्या एकात्मतेवर घाला घालणारा आहे. देशातील अनेक नागरिकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे त्यांची भविष्यात अडचण होऊ शकते. समाजात याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. समाजामध्ये या कायद्यावरुन नाराजी आहे. याविरोधात तरुण पीढी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. मात्र ही आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात तयार झालेल्या परिस्थिती बदलायची असेल तर महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्गच योग्य आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं. तर जेएनयूमधील घटनेचा निषेध करत देशभरात त्याविरोधात आवाज उठवला जात आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं.


यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या गांधी शांती यात्रेचं कौतुक केलं पाहिजे. सरकार सहज आपलं म्हणण ऐकूण घेईल असं नाही. मात्र ही राजकीय लढाई असून ती राजकीय व्यासपीठावरच लढली पाहिजे. आपण संविधानासाठी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अजेंड्यासाठी लढत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.