मुंबई: 12 मार्च 1993 ला मुंबईला रक्तरंजीत करणाऱ्या कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह त्याच्या साथीदारांना न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. विशेष टाडा न्यायालयाने मुंबईच्या मारेकऱ्यांना शिक्षा ठोठावली.

याप्रकरणी अबू सालेम आणि करिमुल्लाला जन्मठेप, ताहीर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली. तर रियाज सिद्दीकीला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आला.

अबू सालेमच्या जन्मठेपेची गुंतागुंत

अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  मात्र त्याला पोर्तुगालमधून भारतात आणताना जो हस्तांतरण करार झाला होता, त्यानुसार अबू सालेमला फाशी किंवा 25 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा देता येणार नव्हती. त्यामुळे अबू सालेमला जास्तीत जास्त 25 वर्षे शिक्षा देण्यात आली. त्यामुळे अबू सालेमला 25 तुरुंगात काढावी लागतील.

करिमुल्ला खान: जन्मठेप

या बॉम्बस्फोटातील दुसरा आरोपी करिमुल्ला खानलाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र करिमुल्लाला अबू सालेमप्रमाणे 25 वर्ष नव्हे तर मरेपर्यंत तुरुंगात राहावं लागले.

ताहीर मर्चंट आणि फिरोज खानला फाशी

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना पाकिस्तानात प्रशिक्षणादरम्यान मदत केल्याचा आरोप असलेल्या ताहीर मर्चंटला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

तर रायगडमधील दिघी आणि शेखाडी बंदरावर आरडीएक्स उतरवून मुंबईत पाठवणाऱ्या फिरोज खानलाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

रियाज सिद्दीकीला दहा वर्षांची शिक्षा

बॉम्बस्फोटाच्या षडयंत्राचा आरोप असलेल्या रियाज सिद्दीकीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. रियाजवर जो आरोप होता, त्या आरोपाअंतर्गत होणाऱ्या सर्वाधिक शिक्षा ठोठावण्यात आल्याचं वकिलांनी सांगितलं.

कोणाला किती शिक्षा

  • ताहीर मर्चंट, फिरोज खान - फाशी

  • अबू सालेम - 25 वर्षे कारावास

  • करिमुल्ला खान - जन्मठेप

  • रियाज सिद्दीकी - 10 वर्षे


मुस्तफा डोसाचा मृत्यू

1993 मुंबई साखळी स्फोटाप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने मुस्तफा डोसा, कुख्यात गँगस्टर अबू सालेम, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खान, रियाझ सिद्दीकी, ताहिर मर्चंट या सहा आरोपींना दोषी ठरवलं होतं.

यातील एक दोषी मुस्तफा डोसा याला सीबीआयने फाशीची मागणी केली होती. पण शिक्षेच्या युक्तीवादादरम्यानच त्याचा मृत्यू झाला होता. तर यातला सातवा आरोपी अब्दुल कय्यूम याची कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केली होती. त्यामुळे आज पाच जणांना शिक्षा सुनावण्यात आली.

12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट

12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले  होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला होता.

या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली.

साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.

संबंधित बातम्या

1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार!

1993 बॉम्बस्फोटातील दोषींना लवकरच शिक्षा सुनावणार


मुंबईतील 1993 च्या स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू


1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत आजपासून युक्तीवाद


1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद


12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?


मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष


संबंधित फोटो फीचर


1993 मुंबई साखळी स्फोट : कोणावर काय आरोप?