मुंबई : वनविभागानं जंगलांमधील पाणवठ्याच्या ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील जंगल, अभयारण्य आणि वनक्षेत्रामधील 19 पक्षी आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत तर 10 प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं उघड झालं आहे.


माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी ही माहिती समोर आणली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात दरवर्षी वनविभागाकडून जंगलातील पाणवठ्यांच्या ठिकाणी सर्वेक्षण केलं जातं. उन्हाळ्यात पाणवठे कमी झालेले असतात त्यामुळे बरेचसे प्राणी-पक्षी जंगलातील तळी, पाणवठे या ठिकाणी एकत्रच पाणी पिण्यासाठी येतात.


या प्राण्यांची पाणवठ्यावर दिसण्याची वारंवारिता तपासली गेली. यामध्ये जंगलातील बऱ्याच प्राण्यांच्या प्रजाती पाणवठ्यांवर दिसलेल्याच नाही. अनेक प्राणी आणि पक्षांच्या संख्या लक्षणीय घट झाली आहे.


वनविभागाला 2017 साली पक्ष्यांच्या 19 प्रजाती अगदी सर्व्हे करायलाही सापडल्या नाहीत. माळढोक, बहिरी ससाणा, धनेश, नीळकंठ आणि सारस या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. माळढोक हा माळरानावरचा सर्वात राजबिंडा पक्षी मानला जात असे. मात्र आजमितीला सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्यात केवळ 3 पक्षी माळढोक शिल्लक आहेत. धक्कादायक म्हणजे अनेक वर्षांपासून त्यांचं प्रजननही झालेलं नाही. गिधाडांच्या बाबतही हीच परिस्थिती आहे.


पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याची विविध कारणं आहेत. वृक्षतोड, अनियंत्रित विकास , शेतीचा विस्तार आणि शिकार ही त्याची प्रमुख कारणं असल्याचं पशुतज्ज्ञांनी सांगितलं.


देशात ठराविक पशुपक्ष्यांच्या प्रजातीलाच दिलं जाणारं मह्त्व या पक्ष्यांच्या जीवावर उठलं आहे. वाघ वाचवण्यासाठी एनजीओ आणि शासन स्तरावर अनेक प्रयत्न झाले, त्याचा परिणाम वाघांची संख्या वाढण्यात झाला. राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनच्या देखभालीसाठी लाखो रुपयांचा चुराडा केला गेला. हेच भाग्य याही पक्ष्यांना लाभायला हवं. नाहीतर, पुढच्या पिढीला हे पक्षी फक्त चित्रांतच बघायला मिळतील.