भिवंडी : माजी महापौर जावेद दळवी यांच्यावर नाराज झालेल्या भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या 18 बंडखोर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी महापालिकेचे उपमहापौर इम्रान खान यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. या वेळी कोरोनाविषयक कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही. कोणीही मास्क लावला नव्हता. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचाही पुरता बोजवारा उडाला. यानंतर कोरोना नियमांचे पालन न झाल्याचं कबूल करत त्यांनी माफीही मागितली.


अजित पवार, जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
महापौर निवडणुकीपासून काँग्रेसपासून दूर झालेल्या भिवंडी महापालिकेच्या 18 नगरसेवकांनी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने शहरात काँग्रेसची ताकद कमी झाली असून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. मात्र भिवंडी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजकारणाला वैतागून आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं या 18 नगरसेवकांनी सांगितलं.


माजी महापौरांविरोधा काँग्रेस नगरसेवकांची नाराजी
काँग्रेसच्या जावेद दळवी यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात भाजपशी संगनमत करुन भाजप नगरसेवकांना मदत केली. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असतानाही आमच्या वॉर्डमध्ये साधे गटार, नाले आणि रस्त्यांची कामे देखील झाली नाहीत. आम्ही जेव्हा आमच्या वॉर्डातील निधीसाठी मागणी करत होतो त्यावेळी आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी आमच्या प्रभागांमध्ये विकासकामे झाली नसल्याने आमच्या विरोधात स्थानिक नागरिकांचा रोष वाढत होता. त्यामुळेच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची कबुली या नगरसेवकांनी या पत्रकार परिषदेत दिली.

जावेद फारुकी हे आमच्या मित्र परिवारातील असून त्यांच्या शब्दाखातरच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं या 18 नगरसेवकांनी सांगितलं. आमच्या पक्ष प्रवेशाने जर काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल. आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर पुन्हा निवडून येऊन शहरच्या विकासासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही देखील नगरसेवकांनी दिली आहे.


भिवंडी महापालिकेतील स्थिती
भिवंडी महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 90 जागांपैकी कॉंग्रेसने 47 जागा मिळवून बहुमत संपादन केलं होतं. तर भाजपने 20, शिवसेनेने 12, कोणार्क आघाडी 4, रिपब्लिकन पक्षाने 4, समाजवादी पक्षाला 2 आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कॉंग्रेसने 2017 मध्ये शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने महापौरपद मिळवलं होतं. त्याबदल्यात काँग्रेसने शिवसेनेला उपमहापौर पद दिले होते. त्यामुळे भाजप आणि कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजप-कोणार्क विकास आघाडीला होती. त्यामुळे 2019 मध्ये महापौर निवडणुकीत भाजप-कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली होती.