नवी मुंबई : आपल्या बॉयफ्रेण्डला नवी बाईक घेता यावी यासाठी स्वतःच्याच घरात एका तरुणीने दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीने आईचे 1.76 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचं वृत्त आहे.
9 मे रोजी डॉक्टर आणि त्यांची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. घरी परतल्यावर कपाटातील सात तोळे सोनं गायब असल्याचं दाम्पत्याच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ पोलिसात चोरीची तक्रार नोंदवली.
दोन आठवड्यांनंतर म्हणजे 23 मे रोजी त्यांची मुलगीही बेपत्ता झाली. ती अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाची केस दाखल केली. तिच्या शाळेतील मित्रांच्या माहितीनुसार 20 वर्षीय कॉलेज विद्यार्थ्यासोबत तिचं प्रेमप्रकरण होतं. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही नुकतीच त्याने 85 हजारांची स्पोर्ट्स बाईक घेतल्याचं, मित्रांनी सांगितलं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणी घरी परतली. आईने तिला ठावठिकाणा विचारला असता, मोठ्या भावासोबत भांडण झाल्यामुळे रागात आपण घर सोडल्याचं तिने सांगितलं. ट्रेनने कर्जतला गेले आणि प्लॅटफॉर्मवरच रात्र काढली. मात्र राग शांत झाल्यावर घरी आले, असा दावा तिने केला.
यावेळी पोलिसांनी पालकांसमोर मुलीला दटावलं असता तिने चोरी केल्याची कबुली दिली. बॉयफ्रेण्डसोबत फिरता यावं म्हणून ही चोरी केली, मात्र सोनं विकता न आल्यामुळे त्याने मित्रांची मदत घेतली. त्यानंतर 1.76 लाखांचे सोन्याचे दागिने त्यांनी 85 हजारांना विकले आणि बाईक खरेदी केली.
दरम्यान पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून अल्पवयीन तरुणीला ज्युवेनाईल कोर्टात हजर केले जाणार आहे.