मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा पोस्टरवॉर सुरु झालं आहे. मुंबईतले वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल, असं म्हणत भाजप नेते आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी शिवसेनेवर वार केला होता. त्याला शिवसेनेने आपल्या स्टाईलने उत्तर दिलं आहे.

 

घाटकोपर परिसरात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी प्रकाश मेहता यांची तुलना माजलेला बोका अशी करत, मुंबईचे खरे वाघ शिवसेनाच असल्याचं ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याचसोबत आजच्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातूनही सिंहाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या वाघाचा फोटो छापत भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपमधे गेल्या काही दिवसांपासून खटके उडत आहेत. त्यातच प्रकाश मेहतांनी केलेल्या वक्तव्याला शिवसेनेने पोस्टरमधून उत्तर दिल्याने हा वाद आता पुढचे काही दिवस अजून तापणार यात काही शंका नाही.

 

प्रकाश मेहता काय म्हणाले होते?

 

मुंबईतले वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल, असं वक्तव्य करुन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

 

कर्नाक बंदर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया’चं प्रतिक असलेल्या सिंहाचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी मेहता यांनी गुजराती भाषेत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

संबंधित बातम्या


वाघ संपले, सिंहांचं राज्य म्हणणाऱ्या प्रकाश मेहतांच्या घरासमोर रातोरात पोस्टर्स


मुंबईतले वाघ संपले, आता सिंहाचं राज्य, प्रकाश मेहतांचा सेनेवर निशाणा