नवी मुंबई : डोक्यावर रणरणतं ऊन, पोटामध्ये भुकेचा आगडोंब आणि चालून-चालून दोन्ही पायाला आलेली सूज अशा अवस्थेत अर्चना (नाव बदललेलं आहे) रेल्वे रुळांवरून चालत चालत आपल्या गावापर्यंत आली. समोर गावाची हद्द दिसली आणि तिला अश्रू अनावर झाले. अशा अवस्थेतच ती त्याच ठिकाणी खाली रेल्वेच्या रुळांवर बसली. गावात काम करणाऱ्या महिला ग्रामसेविकेच्या ही गोष्ट लक्षात आली. धावत धावत जाऊन माधवी कदम या ग्रामसेविकेने अर्चनाला आधार दिला. आणि तिच्यावर उपचार सुरू केले. ही गोष्ट आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दळखन या गावातील 15 वर्षीय अर्चनाची आणि याच गावात काम करणाऱ्या महिला ग्रामसेविका माधवी कदम यांची.
ग्रामसेविकेसह मुलगी
शहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाडे आहेत. त्यापैकी एक गाव म्हणजे दळखन. अर्चना याच गावची. या गावांमध्ये अर्चना तिचे आई वडील आणि तिचा मोठा भाऊ गेली अनेक वर्ष राहत होते. जंगल परिसरात फिरून लाकडांच्या मोळ्या गोळा करून त्यांची विक्री केल्या नंतरच अर्चनाच्या कुटुंबाचे पोट भरायचं. या कमाईतून कुटुंबाला दोन वेळचं खायला मिळेना असं झालं. त्यामुळे गेली अनेक वर्ष अर्चनाचा मोठा भाऊ आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन पुण्याला रोजगारासाठी निघून गेला. पुण्यामध्ये रोजगार मिळू लागल्यामुळे आपल्या लहान बहिणीला ही त्याने पुण्याला बोलावून घेतलं. गेली दोन-तीन वर्षे अर्चना आपल्या मोठ्या भावाच्या झोपडीमध्ये राहून ती सुद्धा काबाडकष्ट करत होती. अर्चना अशिक्षित असल्यामुळे ती पुण्यामध्ये मिळेल ती कामं करून आपल्या भावाच्या कुटुंबीयांसोबत राहत होती.
इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूने भारतात प्रवेश केला. हळूहळू तो महाराष्ट्रात दाखल झाला, आणि सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन झाल्यानंतर पहिले दोन-तीन आठवडे आपल्या घरामध्ये असणाऱ्या अन्नधान्य सोबत इतर साहित्याचा वापर करून अर्चना आणि तिच्या भावाच्या कुटुंबीयांनी आपल्या जगण्याची लढाई सुरू केली होती. मात्र, हळूहळू त्यांच्याकडील अन्नधान्य संपलं. पैसे संपले आणि कोणी मदत करायला तयार होत नव्हतं. अशातूनच घरामध्ये खटके उडू लागले आणि या बारीक-सारीक खटक्यांचे रूपांतर वादामध्ये झालं. नाईलाजास्तव जगण्यासाठी अर्चनाला अशा परिस्थितीत ही घराबाहेर पडावं लागलं.
जिल्हा परिषदमध्ये शाळेत अर्चनाची सोय करण्यात आली
आपल्यामुळे आपल्या भावाला आणि त्याच्या कुटुंबीयांना अडचण नको, या कुटुंबात खाणारं आणखीन एक तोंड वाढू नये म्हणून अर्चनाने आपल्या गावी दळखनला जाण्याचा निर्णय घेतला. सोबत असणाऱ्या फाटक्या पिशवीत एक-दोन कपड्यांची जोड घेऊन अर्चना घराबाहेर पडली. पुणे हा 'रेड झोन' मध्ये येतो. या परिसरातून बाहेर जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे आपल्या गावी जाण्यासाठी अर्चनाने पर्याय निवडला तो पुणे-मुंबई जाणाऱ्या रेल्वे रुळांचा. तिला माहिती होतं पुण्याहून मुंबईला जाणारे हे रेल्वेचे रूळ आपल्या गावाच्या हद्दीतून जातात. या विश्वासावर अर्चनाने या रुळांवरून चालायला सुरुवात केली. पराकोटीच्या दारिद्र्याला आणि कोरोना सोबत दोनहात करण्यासाठी अर्चना सोबत होती एक फाटकी पिशवी आणि तिचा आत्मविश्वास.
पुण्याहून मुंबईला रस्तामार्गे यायचं असेल तर 148 किलो मीटर इतके अंतर होते आणि रेल्वे मार्गे घ्यायचा असेल तर 96 किलोमीटर अंतर आहे. याची कल्पना अर्चनाला नसावी. अर्चनाने उपाशीपोटी या प्रवासाला सुरुवात केली. रेल्वेच्या रुळावरून चालत चालत तिने पुणे सोडलं . पुढे जेवढं शक्य होईल तेवढा अंतर कापण्याचा निर्धार तिने केला होता. संध्याकाळ झाल्यानंतर ज्या परिसरात दिवे दिसतील त्या परिसरातच सुरक्षित ठिकाणी मुक्काम करण्याचा निर्णय तिने घेतला. सकाळ झाल्यानंतर पुन्हा तिने चालायला सुरुवात केली. सलग तीन दिवस अर्चना पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे रुळांवरून हळूहळू चालत होती. दिवसभर रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता अर्चनाने हा प्रवास सुरु केला होता. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपल्या गावी जायचं आहे, हा निर्धार पक्का करुन ती चालु लागली होती.
पहिला दिवस कसाबसा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र पोटात आगीचा डोंब उसळला होता. वरून तळपणारं ऊन आणि चालून चालून दोन्ही पायांना आलेली सूज यामुळे तिला वेदना व्हायला सुरुवात झाली होती. मात्र, जीवात जीव असेपर्यंत आपण चालायचंच अशी गाठ तिने आपल्या मनाशी बांधली होती. त्यामुळे सलग दोन दिवस अर्चना हळूहळू या रुळांवरून चालत ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाली. जसजसं पुढे चालेल तसं तिला हा परिसर ओळखीचा वाटू लागला. आपल्या गावातील ही झाडं, हा मार्ग तिच्या परिचयाचा वाटू लागला. जेव्हा तिला आपल्या गावाची हद्द दिसली त्यावेळी मात्र अर्चनाला अश्रू अनावर झाले. आपल्या गावच्या हद्दीत आपण प्रवेश केल्याचे तिच्या लक्षात येताच तिच्या संयमाचा बांध फुटला, ती त्या तापलेल्या रुळांवर बसून मोठ्याने रडू लागली.
ग्रामपंचायततर्फे अर्चानाचं कौतुक
गावच्या हद्दीत रेल्वे रुळांवर बसून एक मुलगी मोठमोठ्याने रडत आहे, ही गोष्ट याच परिसरात काम करणाऱ्या ग्रामसेविका माधवी कदम यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ अर्चनाकडे जाऊन तिची विचारपूस करायला सुरुवात केली. मात्र, गेली तीन दिवस चालून चालून थकलेल्या अर्चनाने माधवी कदम यांना आपल्या जवळ येण्यास मनाई केली. आपण पुण्यातून चालत आलो आहोत, त्यामुळे माझ्याजवळ येऊ नका असं अर्चना त्यांना सांगू लागली. माधवी कदम यांनी गावचे सरपंच पांडुरंग मोकाशी आणि काही सहकाऱ्यांना याची माहिती देऊन अर्चनाला सुरक्षित याच परिसरात असणाऱ्या एका शाळेत आणलं. उपाशी अशक्त आणि चालून चालून सुजलेले पाय यामुळं अर्चनाला तीव्र वेदनाही होत्या. तिच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. माधवी कदम यांनी त्यांच्या सोबत असणारे स्वच्छ कपडे, फळ अर्चनाला देऊ तिला विश्रांतीसाठी शाळेमध्ये ठेवलं. कालपासून अर्चनाच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. माधवी कदम या दररोज ठाण्यातून येताना अपल्या सोबत अर्चनासाठी ताजा सकस आहार आणत आहेत. तिला पोटभर जेवण फळ आणि औषध देऊन माधवी कदम आणि गावातल्या काही महिला तिची काळजी घेत आहेत.
Matoshree | 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
अशक्त अर्चनाचे सुजलेले पाय बघून मला सुरुवातीला धक्का बसला. 15 वर्षाच्या या मुलीवर कोणता प्रसंग आला असेल याची कल्पना मला त्याच वेळी आली. मी अर्चनाजवळ जाऊन तिला मानसिक आधार दिला. आम्ही तिच्यावर उपचार केले. तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून घडलेल्या घटनेची पूर्ण माहिती जाणून घेतली. पुणे ते मुंबई रेल्वे रुळांवरून सलग तीन दिवस चालत येण्याचा अर्चनाचा प्रवास हा तिच्यासाठी आणि आम्हासाठी देखील एक वेदनादायी प्रवास होता. मी अनेक वर्ष आदिवासी पाड्यांमध्ये काम करत आहे. त्यामुळे आदिवासी यांचे राहणीमान आणि त्यांचे स्वभाव कसे आहेत याची मला माहिती आहे. गावात महिला आणि इतर मंडळी सोबत चांगले संपर्क असल्यामुळे या परिसरात काहीही घडलं तर मदतीसाठी हे सर्व ग्रामस्थ मला नेहमी फोन करतात. वेळप्रसंगी मदत ही मागतात. त्यामुळे आमचं एक चांगलं नातं निर्माण झाल्याची माहिती ग्रामसेविकेने दिली.
आदिवासी समाजातील ही पंधरा वर्षाची मुलगी चालत पुण्याहून मुंबईच्या दिशेने आल्याचे कळताच मलाही धक्का बसला. तीन दिवस प्रवासामध्ये तिचे काय हाल झाले असतील याची कल्पनाच न केलेली बरी. ही मुलगी आमच्याच गावातील आदिवासी पाड्यातील असून तिच्यावर सध्या ग्रामपंचायतीच्या वतीने उपचार करून तिची आम्ही देखभाल करीत आहोत. अत्यंत गरीब परिस्थिती असणाऱ्या अर्चनाला यापुढे रोजगार मिळावा यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण असा प्रसंग कोणावरच येऊ नये अशीच मी देवाकडे प्रार्थना करीत आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच पांडुरंग मोकाशी यांनी दिली.
Maharashtra Lockdown | वर-वधूचे वडील सैन्य दलात; कन्यादानाचा मान पुणे पोलिसांना