वसई : पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट पर्यंतचे सर्व रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच फटका वसईतील उमेळमाण-दिवाणमान-नायगांव-टिवरी येथील गावकऱ्यांना झाला आहे. वसईत अंदाजे शंभर ते सव्वाशे वर्ष जून रेल्वेचं फाटक बंद करण्यात आलं आहे. रेल्वेने कोणतीही पूर्व सूचना न देता हे फाटक बंद केल्याने पूर्व आणि पश्चिमेकडील शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. हे फाटक लवकरात लवकर उघडावं यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा देखील सुरु आहे. सध्या हे फाटक बंद असल्यामुळे 5 ते 10 किलोमिटरचा वळसा घालून शेतात जावं लागत आहे. केवळ शेतकरीच नाही तर मीठ उत्पादक, मच्छिमार तसेच घरकाम करणाऱ्या महिलांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वसईच्या उमेळमान गावातील राहणारे, पश्चिम रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता मागील 2 महिन्यांपासून हे रेल्वे फाटक बंद केलं आहे. तसा या रेल्वे फाटकाला 100 ते 125 वर्षाचा इतिहास आहे. जेव्हा वसईत रेल्वे धावत नव्हती तेव्हापासून इथल्या शेतकऱ्यांचा हा हक्काचा रस्ता होता. सुरुवातील जेव्हा दोन लाईन सुरु झाल्या तेव्हा रेल्वेने त्यांना फाटक बनवून दिलं होतं. फाटकाच्या पूर्वेला राजावली, टीवरी, नायगांव अशी गाव आहेत तर पश्चिमेला उमेळमान, दिवाणमान, ब-हाणपूर ही गाव आहेत. तर उमेळमान, दिवाणमान, ब-हाणपूर या गावातल्या अनेक ग्रामस्थांची, 50 एकर शेती ही वसई पूर्वेकडे आहे. पूर्वी याच रस्त्यावरून बैलगाडी जात असल्याचं इथले शेतकरी सांगत आहेत.
वसईच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी मिठागर आहेत. मीठ उत्पादक करणारे शेतकरी मजूर यांना देखील आता जाण्यायेण्यासाठी मोठा त्रास होत आहे. तर घरकाम करणाऱ्या महिला देखील याच गावातून ये जा करत असतात. त्यांचे देखील हाल झाले आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत रेल्वेने हे फाटक आम्हाला कोणतीच पूर्व सुचन न देता बंद केल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे. सध्या रेल्वेने दोन्ही ठिकाणी भिंत आणि लोखंडी गर्डरच्या साह्याने हा रस्ता बंद केला आहे. सध्या इथल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी तब्बल 5 ते 10 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत आहे. त्यातच आता भात पेरणीची काळ जवळ आला आहे. असं असताना आता भात पेरणी करायची कशी, असा प्रश्न या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या समोर पडला आहे.
फाटक लवकरात लवकर पुन्हा सुरु व्हावं यासाठी स्थानिकांनी रेल्वेकडे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी देखील केली आहे. नाहीतर आम्हाला ये जा करण्यासाठी छोटा ब्रिज तरी बनवून द्यावा अशीही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, रेल्वेने अद्याप त्यांना कोणतचं उत्तर दिलं नाही.
काही वर्षांपूर्वी सुरु झालेला दिवा वसई या रेल्वे मार्गासाठी पश्चिम रेल्वेने कवडीमोल भावात शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या होत्या. तेव्हा रेल्वेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, तेव्हाही नोकऱ्या मिळाल्या नसल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नसल्याचं सांगत असताना आमच्या सारख्या शेतकऱ्यावर असा अन्याय का? असा सवाल इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे.