मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच माजी पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांनी खंडणी वसुल केल्याचा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी केला आहे. माझ्या डीसीपीडीएल कंपनीत 52 टक्के शेअर्स असलेल्या किरण कुमार, इंदरमल रामाणी आणि सीआय युनिटच्या पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरून माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मुंबईतील प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केला आहे.
सीआय युनिटमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, तपास अधिकारी रियाझ काझी यांनी माझी व माझ्या कुटुंबियांची मालमत्ता आणि व्यवसाय हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही छाबरिया यांनी केला. 2015 मध्ये मी डीसी अवंती स्पोर्ट्स कार डिझाईन करून बाजारात आणली. या कारच्या उत्पादनासाठी मला गुंतवणुकीची गरज होती. त्यावेळी किरणकुमार नावाची व्यक्ती मला भेटली. त्याने मला आपली ओळख उद्योजक म्हणून करून देत माझ्या कंपनीत गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले. त्याने गुंतवणूक केल्यावर तो लबाड असल्याचे आमच्या लक्षात आले. माझ्या कंपनीत मी स्वतः 60 कोटी रुपये गुंतविले होते. मात्र, कंपनीतील अधिकांश भागीदार कंपनीच्या व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष कार्यात सहकार्य करत नव्हते, असेही छाब्रिया यांनी सांगितले.
माझी महत्वकांक्षा असलेल्या या कार डिझाईन प्रकल्पाला कर्जातून बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न सुरू होता. त्यावर तोडगा म्हणून किरणकुमारने माझी पत्नी कांचन छाब्रिया हिच्या नावाने असलेल्या पुण्यातील माझ्या मालमत्तेचा विक्री करार इंदरमल रामानीसोबत करण्यास मला भाग पाडले. किरणकुमारने 31 मार्च 2018 रोजी मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारे अनेक कॉल्स केले. याबाबाबत मी आयआरपीला पत्र लिहून जुहू पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, त्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचे छाब्रिया यांनी सांगितले.
Dilip Chhabria Arrest | सापळा रचून दिलीप छाब्रीयांना अटक
यासंदर्भात 12 नोव्हेंबर 2020 रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. इंदरमल रामाणीने किरणकुमारला सोबत घेऊन माझ्या कंपनीत तयार झालेल्या अनेक कार बनावट इंजिन आणि चासी नंबर लावून विकल्या होत्या. मात्र, सर्व गुन्ह्यातून मोठ्या हुशारीने नामनिराळे राहून इंदरमलने किरणकुमारविरुद्ध तक्रार दाखल केली. इंदरमल रामाणीला माझ्याकडून पैसा उकळण्यात अपयश आल्यामुळेच त्याने परमबीरसिंग यांच्या मदतीने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला अटक करायला लावल्याचे छाब्रिया यांनी स्पष्ट केले.
मला अटक होताच सचिन वाझे, रियाझ काझी, होवाळ या तिघांनी कपिल शर्माला बोलावून घेत माझ्याविरुद्ध खोटा एफआयआर दाखल केला. पैसे अदा करूनही कपिल शर्माला मी व्हॅनिटी व्हॅन दिली नाही, असा आरोप त्याने माझ्यावर केला होता. मात्र, वास्तविक पाहता ही तक्रार दिवाणी स्वरूपाची होती. तरीही पोलिसांनी मला या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप छाब्रिया यांनी केला.
कपिल शर्माची फसवणूक, कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांची बहिण अटकेत
सचिन वाझेने माझ्याकडून 25 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी माझा व माझ्या कुटुंबातील सदस्यांचा खूप छळ केला. 25 कोटी दिले नाही तर तुला आणखी 15 गुन्ह्यांत अडकवतो, अशी धमकी वाझे देत होता. परमबीरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचे छाबरिया यांनी म्हटले आहे. सीआय युनिटच्या अंतर्गत तपास असलेल्या सर्व प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. खंडणीचे आरोप असलेल्या प्रकरणांचीही जनहितासाठी फेरचौकशी करण्याची मागणीही छाब्रिया यांनी आपल्या पत्रातून केली आहे.