मुंबई: शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधातून विषबाधा झाल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदणी साहिल शेख असं या 12 वर्षीय दुर्दैवी विद्यार्थिनीचं नाव आहे. तर 139 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतल्या गोवंडीतील महापालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला.


संजय नगरमधील उर्दू माध्यमाच्या पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना औषधं दिली होती. या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या विषबाधेमुळे चांदणी शेखचा मृत्यू झाला, तर अन्य विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम, रक्तवाढीची औषधं दिली जात होती. मात्र या औषधांनी विद्यार्थ्यांना उलट्या, जळजळ होऊ लागली.  विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यानच्या काळात चांदणीचा मृत्यू झाला.

या सर्व प्रकारामुळे गोवंडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना नेमकी कोणती औषधं दिली, या प्रकारात कोणी हलगर्जी केली, याबाबत आता चौकशी होत आहे.

दरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर जमलेल्या पालकांनी शाळेविरोधात घोषणा देऊन शाळेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सौम्य लाठीमार करुन गर्दीला पांगवण्याची वेळ पोलिसांवर आली...सध्या या शाळेसमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय..