मुंबई : 14 व्या आंतरविद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुंबई विद्यापीठाने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मात्र यावेळी बक्षीस आणि निरोप समारंभ कार्यक्रमात कोल्हापूर आणि जळगाव विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपदावर आक्षेप घेत गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. परीक्षकांनी आपलं म्हणणं ऐकून न घेता मुंबई विद्यापीठाच्या टीमला विजेतेपद घोषीत केल्याने या गोंधळ उडल्याच समोर आलं. त्यानंतर कुलगुरू सुहास पेडणेकर आणि इतर अतिथी हे गोंधळ पाहून स्टेजवरून निघून गेले. तरीदेखील हा गोंधळ विद्यार्थ्यांनी सुरू ठेवला त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना शांत केलं. यानंतर त्यांची तक्रार विद्यापीठ आणि स्पर्धा प्रशासनाने नोंदवून घेतली. 28 ते 31 जानेवारी, 2020 दरम्यान मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या आंतरविद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने 93 गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई विद्यापीठाने 15 सुवर्ण आणि 6  रौप्य पदकांची कमाई करत अविष्कार संशोधन स्पर्धेवर सलग तिसऱ्या वर्षी विजयी मोहोर उमटवली. मुंबई विद्यापीठाच्या वतीने या स्पर्धेमध्ये एकूण 48 संशोधक सहभागी झाले होते. सहा वर्गवारीतून आणि चार गटातून एकूण 573 प्रकल्प सादर करण्यात आले. यामध्ये पोस्टर किंवा मॉडेल सादरीकरण आणि मौखिक सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या नवकल्पकतेतून साकारलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जे काही संशोधन झाले आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. दैनदिन जीवनात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक संशोधक पुढे सरसावले आहेत. पोलीओ, टीबी यासारख्या आजांरावरील लस, एलईडी, बॉलपेन, नॉयलॉन, पॉलिमर यासह अनेक क्षेत्रातील संशोधनाची उदाहरणे देऊन पद्म विभूषण प्रा. एम.एम. शर्मा याणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच इन्वेन्शन आणि इनोव्हेशन याची सांगड कशी घालावी हेही उदाहरणासह स्पष्ट करुन सांगितले. यंदाच्या वर्षी खास म्हणजे मुंबई विद्यापीठाकडे याचे यजमानपद होते. या गोंधळाबाबत बोलताना मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले की, याआधी सुद्धा गोंडवाना आणि नांदेड येथे झालेल्या स्पर्धांमध्येही असाच गोंधळ झाला होता.