मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या थियेटर ऑफ आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांना आम्ही सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला असून ते सुट्टीवर गेल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान त्यांच्या जागी प्रभारी संचालक म्हणून प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्रचे विद्यार्थ्यांनी नाट्यशास्त्र विभागात असलेल्या गैरसोयी विरोधात आंदोलन केलं होतं. अनुभव नसलेले शिक्षक, विना लेक्चर्स अभ्यासक्रम पूर्ण करणे, कोणतेही सोयीसुविधा नाट्यशास्त्र विभागात नसणे आणि विद्यार्थी विरोधी वातावरण तयार झाल्याने नाट्यशास्त्र विभागात असलेल्या गैरसोयी विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर अखेर सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. नाट्यशास्त्रच्या विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचं पत्र रजिस्ट्रार अजय देशमुख यांनी काढलं होतं.
13 तारखेला सक्तीच्या रजेवर सोमण यांना पाठवत असल्याचं पत्रक विद्यापीठाने काढल्यानंतर आज पुन्हा यामध्ये यू टर्न घेऊन सोमण सुट्टीवर गेले असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. विभागातील सर्व प्राध्यापकांच्या पात्रतेची तपासणी विद्यापीठाने करावी अशी मागणीचे निवेदन आज अभाविपने दिले आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन का केले? हा प्रश्न न समजून घेता एक विभागाच्या संचलकाला तडफडकी सक्तीच्या रजेवर पाठविणे हे नियमात बसत नाही. जर विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार योगेश सोमण यांच्यासोबत या विभागात शिकवणारे प्राध्यापक यांची पात्रता नसेल तर त्याला जबाबदार कुलगुरू, कुलसचिव असणार. त्यासाठी जबाबदार योगेश सोमण का ठरविण्यात आले ? असा प्रश्न विद्यापीठाला अभाविपने विचारला आहे.
या निवेदनाचा विद्यापीठ विचार करणार असून इतर प्राध्यापकांची सुद्धा पात्रतेची तपासणी नेमलेली समिती करणार असून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आहे.
तर दुसरीकडे रजेवर असलेल्या योगेश सोमण यांच्या जागी प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांना मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अँड आर्टस् विभागाचे प्रभारी संचालक म्हणून धुरा सांभाळणार आहेत. सोमण हे सुट्टीवर गेल्यानंतर आता प्रा गणेश चंदनशिवे यांची प्रभारी विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. योगेश सोमण प्रकरणात मुंबई विद्यापीठाने नेमलेल्या समितीचा निर्णय येईपर्यंत गणेश चंदनशिवे कारभार पाहणार आहेत. गणेश चंदनशिवे हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
दुसरीकडे प्रा योगेश सोमण यांनी 14 डिसेंबर रोजी फेसबुकवर काँग्रेसचे राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करत एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. त्याला एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शविला होता व सोमण यांना तातडीने निलंबित करावे, या मागणीसाठी संघटनेने कुलगुरूंच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. यावेळी कुलगुरूंनी संचालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आता सोमण प्रकरणात नेमण्यात आलेली समिती या सगळ्याचा विचार करून लवकर आपला निर्णय देणार आहे
'सोमण सुट्टीवर गेले', योगेश सोमण प्रकरणी मुंबई विद्यापीठाचा यू टर्न, गणेश चंदनशिवे प्रभारी संचालक
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
16 Jan 2020 11:11 PM (IST)
निवेदनाचा विद्यापीठ विचार करणार असून इतर प्राध्यापकांची सुद्धा पात्रतेची तपासणी नेमलेली समिती करणार असून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -