मुंबई : मुंबई विद्यापीठाचा ताण कमी व्हावा आणि कोकणातील विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी कोकण विद्यापीठ स्थापन करणार असल्याची माहिती राज्याचे नवे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी एपीबी माझाशी बोलताना दिली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड या जिह्यातील कॉलेज मिळून हे विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. कोकण विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात राज्य शासनाला शिफारस करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार असल्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली आहे.
मुंबई विद्यापीठाचं विभाजन करुन कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावं ही मागणी गेल्या काही वर्षांपासून कोकणातील विद्यार्थ्यांकडून होत होती. विद्यार्थ्यांना आणि पालकांना छोट्या-मोठ्या कारणांना शेकडो किमीचा प्रवास करुन मुंबई विद्यापीठात यावं लागत होतं. तसेच मोठा पसारा असल्याने मुंबई विद्यापीठावरही भार येत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी होईल, यासाठी हे विद्यापीठ स्थापन होणे गरजेचं आहे.
कोकणतील जिल्ह्यांमध्ये समुद्रकिनारा लाभला असल्याने स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक अशा प्रकारचे व्यवसायिक अभ्यासक्रम तयार केले जावेत. जेणेकरून स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असंही उदय सामंत यांनी सांगितलं.
या नव्या विद्यापीठासाठी राज्य शासन एक समिती नेमणार असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय हे या समितीचे अध्यक्ष असणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. सध्या मुंबई विद्यापीठाअंतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे आहेत. या विद्यापीठात तब्बल 810 कॉलेज आहेत. त्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यातील 88 महत्वाचे कॉलेज व इतर कॉलेज एकत्र करून हे विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.