नवी दिल्ली : लडाखला चीनचा भूभाग दाखवणाऱ्या नकाशाबाबत ट्विटरने संसदीय समितीसमोर लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे. संसदीय समिती सभापती मीनाक्षी लेखी यांनी बुधवारी सांगितले की, ट्विटरने आश्वासन दिले आहे की या महिन्याच्या अखेरीस त्यांची चूक सुधारली जाईल. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना मीनाक्षी लेखी म्हणाल्या की ट्विटर इंकचे प्रमुख प्रायव्हसी अधिकारी डेमियन करिन यांनी सही केलेलं प्रतिज्ञापत्र प्राप्त झाले आहे.
गेल्या महिन्यात डेटा संरक्षण विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीने लडाखला चीनचा भाग दाखवल्याबद्दल तीव्र टीका केली होती. विश्वासघात असल्याचे सांगून ट्विटरकडून याबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं.
मीनाक्षी लेखी यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर हजर असताना ट्विटर इंडियाने माफी मागितली होती. परंतु हे संसदीय समितीच्या वतीने सांगण्यात आले की, हे एक गुन्हेगारी कृत्य असल्याने देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ट्विटर इंडिया नव्हे तर ट्विटर इंडिया इंकद्वारे प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे.
लडाखला चीनचा भाग असल्याचे सांगून आता ट्विटरने प्रतिज्ञापत्रात लेखी दिलगिरी व्यक्त केली असल्याचे मीनाक्षी लेखी यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की भारतीयांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी माफी मागितली आहे आणि 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत चूक दुरुस्त करण्याची शपथ त्यांनी घेतली आहे.
चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल 22 ऑक्टोबर रोजी भारत सरकारने ट्विटरला नोटीस बजावली होती. कडक शब्दात, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय साहनी यांच्या वतीने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्जी यांना देशाच्या संवेदनशीलतेचा आदर करण्यास सांगितले होते.