नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच केजरीवाल सरकारनं पुन्हा बंधनं घालायला सुरुवात केली आहे. लग्न समारभं, मार्केटची गर्दी रोखण्यासाठी दिल्लीत आता तातडीनं हालचाली सुरु झाल्या आहेत. लग्न समारंभासाठी 200 लोकांना परवानगी होती ती कमी करुन पुन्हा 50 वर आणण्याचा निर्णय केजरीवाल सरकारनं घेतला आहे. तर दुसरीकडे जे मार्केट हॉटस्पॉट ठरेल तिथं पुन्हा टाळं ठोकण्याची परवानगीही त्यांनी केंद्र सरकारकडे मागितली आहे.
देशाच्या राजधानीत पुन्हा लॉकडाऊनची वेळ येते का?
ज्या दिल्लीत जुलैमध्ये दिवसाला दोन ते अडीच हजार पेशंट सापडत होते. तिथे गेल्या दहा दिवसांत अचानक दिवसाला 6 ते 7 हजार रुग्ण सापडत आहे. दिवसाला शंभरच्या आसपास बळी जात आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4 लाख 95 हजारावर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत 7 हजार 812 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
दिल्ली पूर्णपणे पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता कमी आहे. कारण व्यापारी संघटनाही आता पुन्हा निर्बंध घालायला विरोध करत आहे. पण किमान काही प्रमाणात ही सक्ती पुन्हा लागू होण्याची शक्यता दिसत आहे. केजरीवाल सरकारच्या मागणीवर आता केंद्राकडून हिरवा सिग्नल येतो का हे पाहावं लागेल.
वाढती थंडी, प्रदूषण आणि सणासुदीच्या तोंडावर झालेली गर्दी ही दिल्लीतल्या कोरोना वाढीची तीन प्रमुख कारणं आहे. याशिवाय अजून एक गोष्ट दिल्ली लॉकडाऊन उठवायला सर्वात उत्सुक राज्य होतं. मेट्रो सप्टेंबर महिन्यातच सुरु झाली. हॉटेल्सही खूप आधी सुरु झाले आणि मार्केटमध्येही ढिलाई वाढली. पण आता अधीरतेनं लॉकडाऊन उठवल्याचा फटका दिल्लीला बसतोय.
एकीकडे दिल्लीत हेल्थ इमर्जन्सीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे राजकारणही जोरात सुरु आहे. कारण छट पूजेसाठी यमुनेच्या घाटावरच परवानगी मिळावी या मागणीसाठी भाजपनं आंदोलन सुरु केलं आहे.
दिल्लीच्या आसपासच्या राज्यातही कोरोनाचा हा प्रसार वाढतो आहे. हरियाणात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकाच शाळेतली 11 मुलं कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यानंतर सरकारनं सर्वच शाळांमध्ये कोरोना चाचणीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यांचीही भीती वाढली आहे. दिल्ली- नोएडा बॉर्डरवर रँडम टेस्टिंग सुरु करण्यात आलं आहे. दिल्लीतून हायवेद्वारे इतर राज्यांत येणाऱ्या चारचाकी, दिल्लीतून मेट्रोनं येणारे प्रवासी यांची अचानकपणे तपासणी करण्याचा निर्णय नोएडात यूपी सरकारनं घेतला आहे. त्यामुळे कोरोना संपला या गैरसमजूतीत राहणं महागात पडू शकतं. जी वेळ दिल्लीत येतेय ती आपल्या शहरात येऊ नये असं वाटत असेल तर वेळीच सावध व्हा.
Haryana | हरियाणातील जींदच्या शाळांमध्ये 11 विद्यार्थी आणि 8 शिक्षक कोरोनाबाधित