दबंग सिनेमानं धुरळा उडवला होता. चुलबुल पांडेसारखा एक पोलीस या सिनेमाने बॉलिवू़डला दिला. त्याशिवाय या सिनेमातली गाणीही खूप गाजली. यातलं एक गाणं होतं मुन्नी बदनाम हुई.. मलाईका अरोराचा भन्नाट डान्स आणि सोबत चुलबुल पांडेची अदा.. अशा या मसाल्याने सिनेमाचं गाणं गाजलं. हे गाणं आत्ता आठवण्याचं कारण असं की आता आणखी एक मुन्नी सोशल मीडियावर ट्रोलर्समुळे बदनाम झाली आहे. ही मुन्नी आहे बजरंगी भाईजान या सिनेमातली.
सलमान खानची मुख्य भूमिका असलेला बजरंगी भाईजान हा चित्रपट आला होता तो 2015 मध्ये. त्यावेळी सलमानचा हा सिनेमा गाजलाच. शिवाय, यात लहान मुलीची भूमिका करणारी मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्राही गाजली. अवघ्या सहा सात वर्षांच्या चिमुरडीने खूपच दखलपात्र काम केलं होतं. आता ती मुन्नी अर्थात हर्षाली पुन्हा चर्चेत आली आहे. कारण या दिवाळीच्या निमित्ताने तिने आपला एक फोटो सोशल मीडियावर टाकत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा स्वीकारण्याऐवजी सोशल मीडियावर तिच्या वयाला धरून नवीनच वाद सुरू झाला. तिचा एकूण फोटो.. तिचं दिसणं आणि तिचं वय यातल्या तर्कवितर्कावर चढाओढ रंगली.
हर्षालीने दिवाळीच्या मुहूर्तावर फोटो टाकून सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कमेंट्सचा पाऊस पडला. बजरंगी भाईजान या सिनेमात अवघ्या 6 वर्षांची असणारी ही मुलगी आता खरंच 12 वर्षांची आहे का यावर चर्चा रंगली. कारण हा फोटो पाहता ती 12 वर्षाची वाटत नाही. उलट ती जास्तच मोठी वाटते असं एकाने म्हटलं. त्यावर दुसऱ्याने मेकअप केल्यामुळे ती मोठी वाटत असावी असं म्हटलं आहे. एरवी पोस्ट टाकून गप्प बसणारी हर्षाली मात्र बोलती झाली. यी पोस्टकर्त्याला सांगताना, हर्षाली म्हणाली, मी कधीच मेकअप करत नाही. हा फोटोही मेकअप केलेला नाही.
हर्षालीने बजरंगी भाईजान या सिनेमात चांगलीच वाहवा मिळवली. तिच्या निरागस डोळ्यांनी अनेकांची मतं जिंकली. एकही संवाद नसून केवळ हावभावातून तिने आपला ठसा उमटवला. आता तिच्या या फोटोमुळे उलटा परिणाम झाला. एकतर तिचं तेव्हाचं वय सहा नसणार.. किंवा तिने आता मेकअप केला असणार अशा तर्कांनी मात्र हर्षाली दमून गेली. म्हणून बजरंगी भाईजानमधली का असेना पण ही मुन्नी उगाच बदनाम झाली.