मुंबई : मराठी भाषा कशीही वळते आणि या भाषेचा गोडवा अफाट आहे. या गोडव्यासह सध्या वाढत्या थंडीत नेटिजन्स मात्र वेगळ्याच मूडमध्ये आहेत. प्रेमात झालेलं ब्रेकअप आणि एखाद्या व्यक्तीला फ्लर्ट करणाऱ्या वाक्यांचा सध्या ट्विटर आणि फेसबुकवर ट्रेंड सुरु आहे. मराठी ब्रेकअप लाईन आणि मराठी फ्लर्टिंग लाईन अशा हॅशटॅगखाली हा ट्रेन्ड सध्या सुरु आहे.

'तब्येत ठीक नाहीये पण तुझा आवाज ऐकला ना की औषधांची सुद्धा गरज भासत नाही', 'मिसळ झालेल्या माझ्या आयुष्याला पूर्ण करण्यासाठी पाव होशील का?', 'आय लव्ह यू, पण फक्त मित्र म्हणून', 'तू सोबत असताना मला कशाचेच भान रहात नाही', 'तुझे डोळे फार सुंदर आहेत', 'तुझ्यासारखी मुलं खूप कमी असतात! खूप वेगळा आहेस तू!' अशा एक नाही अनेक फ्लर्टिंगच्या वाक्यांचा धूमाकूळ सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

तर 'पप्पांना ब्लडप्रेशर आहे रे, त्यांना काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तु मला कायम आवडायचास पण निखळ मित्र म्हणून..., आता मी कुणाला मित्र पण नाही मानू शकणार', 'तू खूप चांगला आहेस तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल', 'तू मला माझ्या भावासारखा वाटतोस', 'माझं तुझ्यावर नाही तुझ्या भाषेवर प्रेम होतं. तुझी भाषा आता पूर्वीसारखी राहिलीय कुठे? जिथे शुद्ध भाषा नाही तिथे प्रेम होऊ शकत नाही', 'माझ्या आईवडिलांनी मला लहानाची मोठी केलीय. त्यांना मी ‘नाही’ नाही म्हणू शकत' अशा मराठीतील ब्रेकअपच्या वाक्यांनी देखील रंगत आणली आहे.

यात सर्वांचं लक्ष वेधलं आहे ते महाराष्ट्र पोलिसांनी. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, नागपूर पोलीस गुन्ह्यांच्या प्रकरणात किंवा नागरिकांच्या मदतीसाठी तर सोशल माध्यमांचा उपयोग करत असतंच. मात्र काही प्रसंगी पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलवरुन खेळीमेळीचं वातावरण देखील बघायला मिळतं. आता या मराठी ब्रेकअप आणि फ्लर्टिंगच्या ट्रेंडमध्ये महाराष्ट्र पोलीसांनी देखील सहभाग घेतलाय. एका ट्वीटमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी 'तुमची काळजी आम्ही घेऊ. #MarathiFlirtingLine' असं म्हटलं आहे. त्यावर अनेक नेटिजन्सनी मजेशीर रिप्लाय दिले आहेत. एकाने म्हटलं आहे तुमची गरज ब्रेकअपनंतर आहे. तर दुसऱ्याने अभिनंदन आणि स्वागतार्ह आहे धन्यवाद मराठी मध्ये पण संदेश लिहिल्याबद्दल, असं म्हणत आभार मानले आहेत.


तर दुसऱ्या ट्वीटमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी 'आपलं नातं कधीही तोडू नये' असं म्हटलंय. त्यावर पुणे पोलिसांनी 'आम्हाला कधीही कॉल करा' असा रिप्लाय दिला आहे.


एकूणच या ट्रेंडचा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ सुरु आहे.