मुंबई : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कांगारुंनी भारताचा 10 विकेट राखून दारुण पराभव केला. त्यानंतर काल (17 जानेवारी) राजकोट येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने चांगलंच पुनरागमन केलं. कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करत भारत मालिकेत परतला. मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. उद्या (19 जानेवारी) बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर उभय संघांमध्ये तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांची आजवरची आकडेवारी पाहता कांगारुंचं पारडं जास्त जड दिसत आहे.
हेड टू हेड भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये आतापर्यंत 139 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 51 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर कांगारुंनी 78 सामने जिंकले आहेत. 10 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
उभय संघांची गेल्या काही सामन्यांमधील कामगिरी मागील पाच एकदिवसीय सामन्यांपैकी तीन सामने भारताने जिंकले आहेत. तर दोन सामने गमावले आहेत. तर ऑस्ट्रेलियाची परिस्थिती उलट आहे. काँगारुंनी मागील पाच सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने गमावले आहेत.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर कोण बलवान? 1. चिन्नास्वामी मैदानावर आतापर्यंत डावात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. 2013 साली कांगारुंविरोधात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने 383 धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
2. या मैदानावर सर्वात कमी धावसंख्येचा विक्रमही भारताच्याच नावावर आहे. 1999 साली पाकिस्तानविरोधात खेळताना भारतीय संघ 168 धावांवर ऑल आऊट झाला होता.
3. चिन्नास्वामी मैदान हे टीम इंडियाचा सलामीवर रोहित शर्मासाठी लकी आहे. या मैदानावर वैयक्तिक सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मैदानावर 209 धावा फटकावल्या होत्या.
4. या मैदानावर सर्वात मोठी भागिदारी रचण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर आहे. या दोघांनी 2017 मध्ये भारताविरोधात 231 धावांची भागिदारी रचली होती. हे दोघेही यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.
चिन्नास्वामी मैदानावरील फलंदाजांचे प्रदर्शन (सर्वाधिक धावा)
फलंदाज | सामने | डाव | धावा |
सचिन तेंडुलकर | 11 | 11 | 534 |
विरेंद्र सहवाग | 7 | 7 | 328 |
रोहित शर्मा | 3 | 3 | 318 |
ब्रॅड हॅडिन | 4 | 4 | 262 |
मायकल क्लार्क | 4 | 3 | 239 |
या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधील प्रेक्षकांचं आणि क्रीडा समीक्षकांचं लक्ष टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याच्या कामगिरीकडे आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना रोहितची बॅट तळपलेली आपण अनेकदा पाहिलं आहे. कांगारुंविरोधात त्याची धावांची आकडेवारी सर्वोत्तम आहे. परंतु या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितचे प्रदर्शन फार चांगलं झालेलं नाही. पहिल्या सामन्यात रोहित 10 धावांवर बाद झाला, तर कालल्या सामन्यात रोहित 42 धावांवर बाद झाला. रोहित गेल्या तीन वर्षांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात रोहितची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहेत.
ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
फलंदाज | सामने | डाव | धावा | स्ट्राईक रेट |
सचिन तेंडुलकर | 71 | 70 | 3077 | 84.74 |
डेसमॉन्ड हेन्स | 64 | 64 | 2262 | 65.14 |
व्हिव रिचर्ड्स | 54 | 50 | 2187 | 84.63 |
रोहित शर्मा | 39 | 39 | 2089 | 93.92 |
ईयॉन मॉर्गन | 54 | 53 | 1864 | 91.41 |
तीन एकदिवसीय सामन्यांच्या सर्वाधिक मालिका जिंकणारे संघ
संघ | खेळलेल्या मालिका | मालिका विजय | जिंकण्याची सरासरी |
भारत | 37 | 23 | 62.16% |
पाकिस्तान | 50 | 31 | 62.00% |
इंग्लंड | 42 | 26 | 61.90% |
दक्षिण आफ्रिका | 32 | 19 | 59.38% |
ऑस्ट्रेलिया | 33 | 19 | 57.58% |
न्यूझीलंड | 48 | 24 | 50.00% |
श्रीलंका | 42 | 20 | 47.62% |
वेस्ट इंडिज | 45 | 18 | 40.00% |