मुंबई : मराठी भाषेचा शासकीय कामकाजात अनिवार्य वापर करण्यासाठी प्रत्येक विभागात मराठी भाषा दक्षता अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्याने कार्यालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी फोनवर मराठीत बोलायचे. सभेमध्ये भाषण करताना मराठीत भाषण द्यायचे. बांद्राच्या ऐवजी बांद्रा आणि सायनच्या ऐवजी शिव असे मराठी शब्द जाणीवपूर्वक वापरायचे आहेत. इथून पुढे पदभरतीचा परीक्षा मराठी भाषेतूनच घ्यायच्या आहेत. सर्व शासकीय अभ्यास गटाने आपला अभ्यास मराठी भाषेतून असल्याचा आणि अहवालही मराठी भाषेतूनच द्यायचा आहे, असे अनेक बदल केले जाणार असून यावर प्रत्येक विभागात मराठी भाषा दक्षता अधिकारी लक्ष ठेवून असणार आहे.


मराठी भाषेचा वापर करण्यासाठी आता हे नियम पाळावेच लागणार

शासकिय योजनांची माहिती देताना  व त्यासंदर्भात चर्चा करताना तसेच दूरध्यनीवर बोलताना संबंधित शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी मराठी भाषेचा वापर करावा.

मंत्रिमंडळ बैठक आणि वरिष्ठ स्तरावर होणाऱ्या तत्सम बैठकीत सादरीकरण (Presentation) करताना दर्शविण्यात येणारी माहिती प्रामुख्याने मराठीत असावी.

विभागातील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील विभागीय व इतर कार्यालयांनी सर्वसामान्य जनतेशी होणारा सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठीतून करण्याची खबरदारी घ्यावी. सर्वसामान्यांपर्यंत जाणारे सर्व नमुना, पत्रके परवाने इत्यादी तसेच कार्यालयांतर्गत वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या नोंदवह्या, प्रमाणनमुने, प्रपत्रे, विभागीय नियमपुस्तिका, सर्व प्रकारच्या टिप्पण्या, पत्रव्यवहार यावरील शेरे/अभिप्राय, शासनचे किरकोळ आदेश, अधिसूचना, प्रारुप नियम, शासन निर्णय, परिपत्रक, अहवाल, बैठकांची कार्यवृत्ते तसेच संकेतस्थळे इत्यादी मराठी भाषेत असावे.

कार्यालयातील नामफलकावर अथवा पत्रव्यवहारावर एखादी व्यक्ती /अधिकारी / कर्मचारी यांचे नाव मराठी भाषेत लिहिताना इंग्रजी आद्याक्षराचे मराठीत भाषांतर न करता ती मराठीतून लिहावे, पदनामाचा उल्लेखही मराठी भाषेत असावा. अधिकारी/कर्मचारी यांनी मराठी भाषेतील टिप्पणी, आदेश, शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना व इतर पत्रव्यवहार यावर देवनागरी लिपीत (मराठी) सह्या कराव्यात.

शासकीय कार्यालयातून लावलेल्या फलक मराठीतून असावे, तसेच शासकीय कामकाजात पत्रव्यवहारामध्ये / निमंत्रण पत्रिके मध्ये इतर बाबींसंदर्भात रेल्वे स्थानके, गावाची नावे याच्या नावाचा उल्लेख करताना मराठी भाषेत देवनागरी लिपित नावे लिहावित (उदा.बांद्रा असे नाव न वापरता वांद्रे हे मूळ मराठी नाव वापरावे. सायन असे नाव न वापरता शीव हे मूळ मराठी नाव वापरावे.)

विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती व इतर कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभाची निमंत्रणं मराठी भाषेत असावीत. क्वचित प्रसंगी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून निमंत्रण पत्रिका असावी.

विभागातून व विभागांतर्गत कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या जाहिराती व निविदा किमान दोन मराठी वर्तमानपत्रातून प्रसिद्धद करणे आवश्यक आहे. तसेच, मराठी वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या आणि मंडळाच्या व महामडळाच्या जाहिराती व निविदा मराठी भाषेत प्रसिद्ध कराव्यात.

विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदा/पंचायत समित्या कर्मचान्यांच्या विभागीय परीक्षा तसेच पदभरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्यात याव्या जर काही परीक्षार्थ्यांनी इंग्रजीतून उत्तर देण्याची परवानगी मागीतली असेल तर अशी परवानगी गुणावगुणांचा विचार करुन विभाग प्रमुखांना देता येईल.

विभागांतर्गत नेमण्यात येणाऱ्या समित्या अभ्यासगट यांनी त्यांचे कामकाज काटेकोरपणे मराठी भाषेतच करावे व आपले सर्व अहवाल मराठी भाषेतच द्यावेत.

विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणारी माहिती राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणणे आवश्यक वाटत असल्यास संकेतस्थळावर ती केवळ इंग्रजी भाषेत न होता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत माहिती प्रसिध्द करावी.