Maharashtra Kesari 2025: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला (Maharashtra Kesari 2025) शेवटच्या दिवशी (2 फेब्रुवारी) गालबोट लागले. गादी विभागातील अंतिम लढतीत पराभूत घोषित केल्याचा पंचाचा निर्णय अमान्य करत नांदेड येथील पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने आखाड्यातच पंचाची कॉलर पकडली. त्यांना लाथही मारली. त्यामुळे कुस्तीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला. याप्रसंगी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत शिवराज राक्षे व त्याच्या सहकाऱ्यांना मैदानाबाहेर काढले. तसेच घडलेल्या या प्रकरानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
लढत अखेरच्या मिनिटांत असताना चढाओढीत महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) पुन्हा एकदा पंचांकडून ताकीद देण्यात आली. या वेळी पृथ्वीराज मोहोळने थोडा चपळपणा दाखवत महेंद्र गायकवाडला ताकदीने कक्षाच्या बाहेर नेत एका गुणाची कमाई केली. याच गुणाला महेंद्र गायकवाडने आणि त्याच्या संघाने आक्षेप घेतला. लढतीची 16 सेकंद राहिली असताना पृथ्वीराज मोहोळ 2-1 असा आघाडीवर होता. त्याक्षणी आक्षेप फेटाळल्याने महेंद्र गायकवाड मॅटवरून बाहेर पडला आणि पुन्हा परतलाच नाही. यानंतर पृथ्वीराज मोहोळला (Pruthviraj Mohol) महाराष्ट्र केसरी किताब देण्यात आला. महाराष्ट्र केसरीच्या सामन्यानंतर महेंद्र गायकवाडच्या समर्थकांनी गोंधळ घातल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला.
...तर मी हार मानायला तयार- शिवराज राक्षे
पंचाने विरोधी मल्लाला विजयी घोषित केले तेव्हा मी या निर्णयावर आक्षेप नोंदविला होता. आक्षेपानंतर कुस्तीचा निर्णय देता येत नाही. मात्र, माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले. मल्लाचे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले असेल तरच त्याला पराभूत घोषित केले जाते. माझे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले नव्हते आणि जर खांदे जमिनीवर टेकल्याचे चित्रीकरणात दिसले तर मी हार मानायला तयार आहे. आम्ही या स्पर्धेसाठी वर्षभर मेहनत घेतो, पंचांनी माझ्यावर अन्याय केला, अशी प्रतिक्रिया शिवराज राक्षेने दिली.
पृथ्वीराज मोहोळ याला मानाची चांदीची गदा आणि महिंद्रा थार गाडी-
महाराष्ट्र केसरी झालेल्या पृथ्वीराज मोहोळ याला मानाची चांदीची गदा आणि महिंद्रा थार गाडी देण्यात आली आहे. पैलवान घरातील आपण चौथ्या पिढीचे पैलवान असून वडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहोळ याने दिली आहे.
