Zilla Parishad Bharti : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा करत राज्यातील 34 जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 30 संवर्गातील 19 हजार 460 पदे भरण्याची जाहिरात 5 ऑगस्ट रोजी प्रकाशित केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील 2019 मध्ये अशीच घोषणा करण्यात आली. पण त्यावेळी ना भरती झाली, ना उमेदवारी दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे मिळाले. त्यामुळे त्या कोट्यवधी रुपयांचे काय झालं असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.


राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी देण्याचा दावा करत सरकारने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची मेगा भरतीची घोषणा केली आहे. ज्यात आरोग्य विभागातील 100 टक्के आणि इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ज्यात, एकूण 30 संवर्गातील 19 हजार 460 पदे भरण्याची जाहिरात 5 ऑगस्ट रोजीच प्रकाशित करण्यात आली आहे. पण याचवेळी 2019-21 मध्ये जाहीर झालेल्या जिल्हा परिषदेच्या भरतीच्या नावावर सरकारने जमा केलेल्या पैशांचं काय झालं आणि ते कधी परत मिळणार असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.


राज्य सरकारने जिल्हा परिषदांमधील विविध 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 मध्ये महाभरतीची घोषणा करत याची प्रकिया देखील सुरु केली होती. त्यामुळे या दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही महाभरती रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी कोट्यवधी रुपये परीक्षा शुल्काचे सरकारच्या तिजोरीत जमा झाले होते. पण भरती रद्द होऊन देखील परीक्षा शुल्क अद्यापही अर्जदार विद्यार्थ्यांना परत मिळालेले नाही. 


2019-21 मधील परीक्षेची आकडेवारी... 



  • जिल्हा परिषदा संख्या : 34 

  • खुल्या वर्गासाठी परीक्षा फी : 500 रुपये 

  • आरक्षित वर्गासाठी : 250 रुपये 

  • एकूण जमा झालेली परीक्षा शुल्क : 33 कोटी 39 लाख 45 हजार 250 रुपये

  • जिल्हा परिषदांकडे वर्ग केलेली परीक्षा शुल्क : 21 कोटी 70 लाख 64 हजार 413 रुपये


आधीच्या परीक्षा शुल्काचे काय झाले? 


विशेष म्हणजे आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद भरतीची घोषणा झाली आहे. मात्र, मागच्यावेळी परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना देखील पुन्हा एकदा नव्याने परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे. ज्यात उमेदवारांना खुल्या वर्गाकडून 1 हजार तर आरक्षित वर्गाला 900 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. त्यामुळे मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.


अनेक उमेदवार ग्रामीण भागातील...


परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. आधीच गावाकडे शेती व्यवसाय संकटात आल्याने तुटपुंज्या पैशांवर दिवस काढत स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यामुळे काळी मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाच्या पैशांची किंमत या सरकारला कळावी हीच माफक अपेक्षा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nashik ZP Bharati : नाशिक जिल्हा परिषदेत काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल 1038 पदांची भरती, संपूर्ण वेळापत्रक वाचा एका क्लिकवर