वाशिम : आज वाशिमकरांनी सावली हरवल्याचा अनुभवव घेतला. एरव्ही सावलीकडे कुणी  निरखून पाहत नाही. मात्र, उन वाढायला लागले की उन आणि सावल्यांचा खेळ नागरिक अनुभवतात. तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला तसे दैनंदिन जीवनातील सावलीचे महत्त्व कमी होत गेले. सध्या याची चर्चा होते ती शाळेत शिक्षण घेताना आणि शून्य सावली दिवसाच्यावेळी. सावलीचे शिक्षण अधिक सुलभ व्हावे व सावलीबद्दलचे अनेक गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने भारतीय खगोल मंडळाने (अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया) 'झीरो शॅडो डे' नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. हे अॅप मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.


रोज दुपारी बारा वाजता सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली नाहीशी होते, असा अनेकांचा  समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. अशी स्थिती काही ठरवीक दिवसांमध्येच निर्माण होते. यासाठी विविध खगोलीय गणितं जुळवून त्या तारखा ठरविल्या जातात. याबद्दल भारतीय खगोल मंडळ गेल्या काही वर्षांपासून देशपातळीवर जनजागृती मोहिम राबवत आहे. ही मोहीम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मंडळाच्या शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष डॉ. नीरज रामानुजन यांनी एक अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला. यानुसार भोपाळमधील अलोक मांडवगणे यांनी 'झीरो शॅडो डे' हे अॅप विकसित केले. या अॅपमध्ये शून्य सावली दिवस जगातील काणत्या भागात कधी असणार आहे, याचा तपशील येतो. तसेच, भविष्यात हे दिवस कधी येणार आहेत याची माहितीही उपलब्ध करून दिली आहे. 


कारंजातही खगोलप्रेमी गोपाल खाडे हे गेले अनेक वर्षांपासुन जि.प. विद्यालय कामरगांव व बाबरे कॉलनीत जनजागृती करत आहे. गोपाल खाडे यांनी आपल्या घरी अंगणात विशिष्ट पद्धतीने साहित्याची मांडणी करुन कोविड नियम पाळुन उपस्थितांना समजाऊन दिले. शालेय शिक्षणात सावलीचे महत्त्व शिकविले जाते. हे सोप्या पद्धतीने शिकविण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग केला जाऊ शकतो. या अ‍ॅपमध्ये केवळ सावलीची उंचीच समजते असे नाही तर यातून सावलीच्या उंचीतील बदल नेमका कसा होतो हेही समजावून सांगण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी यात दिलेला स्लाइड बार वरखाली करून सावलीचे रहस्य समजून घेऊ शकतात. हे अॅप इंग्रजी, मराठीसह अन्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेच.


शून्य सावलीचा दिवस म्हणजे काय?
ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावाच्या अक्षांशाएव्हढी होते, त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावली आपल्या पायाखाली येते व अदृश्य होते. या दिवसाला 'शून्य सावलीचा दिवस' असे म्हणतात. आज कारंजात गोपाल खाडे, अशोकराव ताथोड, ज्ञानेश्वर दामेकर, विलास कडू, ऋत्विक ताथोड, तन्मय खाडे, अवंती खाडे, राधा कडु, समर्थ कडु, हरिश्चंद्र कदम, कौस्तुभ ताथोड यांनी शून्य सावली दिवसाचा आनंद घेतला. यानंतर पुन्हा हा अनुभव 21 जुलैला दुपारी 12 वाजुन 27 मिनिंटानी कारंजात घेता येणार आहे. झेड एस डी अॅप घेवुन खगोल प्रेमी याचा आनंद व माहिती घेऊ शकतात अशी माहिती गोपाल खाडे यांनी दिली.