नाशिक : युवासेनेला नवा सरसेनापती मिळणार असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे मंत्रिपदाच्या कामात व्यस्त असल्यानं त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं प्रमुखपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. ठाकरे कुटुंबाबाहेर पहिल्यांदाच महत्वाचे पद जाणार आहे. गेले काही दिवस वरुण सरदेसाई यांनी महाराष्ट्रभरात दौरे सुरु केलेत. येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांची फौज शिवसेनेच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न युवासेनेकडून सुरू आहे. पण आदित्य ठाकरे मंत्रिपदी व्यस्त असल्यानं युवासेनेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झालीय.


राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर तरुणांना पुन्हा शिवसेनेकडे आकर्षित करण्यात आदित्य ठाकरे आणि त्यांच्या युवासेनेचा मोठा हातभार आहे. स्थापनेपासूनच आदित्य ठाकरे यांनी युवासेनाला उभारी दिली. युवकांची फौज उभी केली. महाराष्ट्र पिंजून काढला, युवासेना प्रमुख या नात्याने संघटनेला चेहरा, कार्यकर्त्यांना कार्यक्रम आणि तरुणांना हक्कच व्यसपीठ दिलं.  निवडणुकीच्या तिकीट वाटपात ही युवासेनाचा दबदबा राहिला आहे.


दहा वर्षाच्या काळात युवासेनेचे अनेक पदाधिकारी नगरसेवकांपासून तर मोठं मोठ्या पदावर गेले आहेत. स्वतः युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मंत्री झाले. मंत्रीपदाच्या जबाबदारीमुळे  आदित्य ठाकरे यांचं संघाटनेकडे दुर्लक्ष सुरू झालं आणि  युवासेनाच्या नव्या सेनापतीचा शोध वरुण सरदेसाई यांच्यापर्यंत येऊन थांबला


कोण आहेत वरुण सरदेसाई?


सिव्हिल इंजिनिअर  असणारे 29 वर्षीय वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ, विश्वासू सहकारी आहेत. युवसेनेच्या जडणघडणीत पडद्यामागचे शिल्पकार 'इंजिनिअर' तेच राहिले आहेत. विद्यापीठ निवडणूक असो अथवा, युवासेनेचे कॅम्पेन प्रत्येकवेळी वरुण यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. आदित्य शिरोडकर, कृष्णा हेगडे यांना शिवबंधन बांधण्यात वरुण यांचाचं पुढाकार होता. आता पडद्यामागचा हा युवा नेता थेट मैदानात उतरला आहे.   वरुण सरदेसाई यांचे झंझावाती दौरे सुरू झालेत. मराठवाडा, विदर्भानंतर वरुण सरदेसाई उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यापुढेही काम करणार असा दावा वरुण सध्या करत असले तरी  त्यांचा हा दौरा नव्या बदलांचे संकेत देणारा आहे


वरुण यांच्याकडे युवासेना प्रमुखाची धुरा गेल्यास शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे नावाव्यतिरिक्त इतरांना महत्वाचं पद मिळणार आहे. आदित्य यांचे मावसभाऊच असल्यानं घराणेशाहीचा दावा खोडला जाणार नसला तरी संघटनेला व्यापक स्वरूप मिळण्यास मदत होणार आहे.  शिवसेनेत आदेश मानला जातो, त्यामुळे पक्ष प्रमुखांनी युवासेना प्रमुखपदाच्या नव्या नावाची घोषणा जरी केली तरी वरुण सरदेसाई यांना आदित्य ठाकरे यांच्यासारखे प्रेम, मिळणार का? आदित्यसारखे  वरुण यांचे आकर्षण तरुणांना राहणार का? पक्षातील नेते नवं नेतृत्व स्वीकारणार का? असे असंख्य प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत


आदित्य ठाकरे सक्रिय राजकारणात कधी उतरणार या बाबत कायमच उत्सुकता होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी दिली. आता तशीच उत्सुकता तेजस ठाकरे यांच्या राजकिय वाटचाली बाबत आह.  आदित्यनंतर युवासेना ची जबाबदारी तेजसकडे जावी अशी काही सैनिकांची भावना असताना वरुण सरदेसाई हा एक नवा पर्याय उभा राहिला आहे.