गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या जिमलगट्टा या अतिदुर्गम भागात किष्टापूर नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे आज पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. हा वरवर पाहता एखाद्या पुलाच्या उद्घाटनाचा सोहळा भासू शकतो. मात्र या किष्टापूर नाल्यावरील पुलाची मागणी 30 वर्षे जुनी होती.


प्रचंड नक्षल प्रभाव असलेल्या या भागात साधा नाल्यावरील पूल बांधण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी जावा लागला. 1992 साली याच पुलावर स्थानिक देचलीपेठा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मलकापुरे यांच्यासह 3 कर्मचाऱ्यांना प्राणास मुकावे लागले होते. नक्षल्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. यानंतर सातत्याने या पुलामुळे संपर्क बाधित असलेल्या 25 गावातील नागरिकांना विकास वाट दिसलीच नाही. अनेक प्रयत्न झाले मात्र यातून मार्ग निघत नव्हता. पूल नसल्याने आरोग्य सुविधा -शिक्षण- व्‍यापार- प्रशासकीय सोयी-सुविधा यापासूनही 25 गावातले नागरिक वंचित होते.


गावातील नागरिकांचा पाठिंबा आणि गडचिरोली पोलीस दलाची खंबीर भूमिका यामुळे 3 वर्षांपासून पोलीस विभागाने या पुलाच्या मागणीकडे सातत्याने लक्ष दिले. या पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य ते सहकार्य आणि सुरक्षा पुरवली गेली. स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील आसपास या सर्वच गावांमध्ये जनजागृती बैठका घेत नक्षल्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले. विकासाच्या वाटेवर व्याकुळ झालेल्या नागरिकांनी 22 गावात नक्षल बंदीचा ठराव करत पोलिसांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला. काम सुरू झाल्यावर यंदाच्या एप्रिल महिन्यात याच पुलाच्या आसपास मोठी जाळपोळ करून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र नक्षलवाद्यांचा विकासविरोधी हेतू लक्षात घेत स्थानिक नागरिकांनी रोज 50 च्या संख्येत ग्रामस्थ या पुलाच्या रक्षण व देखभालीसाठी उपलब्ध केले. पोलीस-सार्वजनिक बांधकाम विभाग-आदिवासी ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून अखेर हा पूल तयार झाला.


गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाने या पुलाचे 'शहीद सेतू' असे सार्थ नामकरण केले आहे. आज या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही विकास वाटेपासून केवळ नक्षल दहशतीमुळे वंचित राहिलेल्या किष्टापूर परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास मिळाला आहे. गडचिरोली पोलिसांच्या प्रयत्नाने हे शक्य झाले आहे.


माझं गाव माझा पाऊस | राज्यभरातील गावांमधून पावसाचे अपडेट्स | गावाकडच्या बातम्यांचा आढावा | 10 जुलै