अकोला : कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरील हल्ल्याचे तसंच त्यांना धमकावण्याचे प्रकार काही केल्या कमी होत नाहीत. लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरताना हटकल्याने तरुणांडून चक्क पोलिसांनाच धमकी दिल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात घडला आहे. या परिसरात दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहा, हातपाय तोडू, अशा शब्दात या टारगटांनी पोलिसांना धमकी दिली.
अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शौकत अली चौक परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या दोन पोलिसांसोबत काल (29 मे) रात्री हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या प्रकरणात अद्यापही कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. तर पोलीस दारु पिऊन आल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी दारु पिण्याचा प्रकारा घडला नसल्याचं सांगितलं.
यापूर्वीही अशी घडला घडली होती, तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कर्मचाऱ्याला निलंबित केलं होतं. तेव्हापासून अकोल्यात पोलिसांवरील हल्ल्याचे, त्यांना धमकी देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. हे तरुण बाहेर फिरताना पोलिसांनी हटकल्याने त्यांनी धमकी देण्यास सुरुवात केली. यानंतर जवळपास 400 जणांचा जमाव इथे जमल्याने पोलिसांना काढता पाय घ्यावा लागला.
यापूर्वी पोलिसाचं निलंबन झाल्याने, कालच्या घटनेतील संबंधित पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची कोणतीही तक्रार नोंदवली नाही. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची कल्पनाच नाही. एबीपी माझाने त्यांना घटनेचा व्हिडीओ पाठवला. त्यानंतर माहिती घेऊन कारवाई करु असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता पोलीस या तरुणांवर कोणती कारवाई करतात हे पाहावं लागेल.
दरम्यान अशाप्रकारे पोलिसांना धमकावण्याचे किंवा हल्ल्याचे प्रकार घडत असतील तर ते अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांचं मनोधैर्य कमी झालं तर पुढच्या काळात अकोल्यातील कायदा-सुव्यवस्था कसा अबाधित राहणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.