पालघर : पावसाळी पर्यटनासाठी (Rain) सध्या तरुणाई ग्रुप-ग्रुपने आणि मित्रांसमवेत बाहेर पडत आहे. त्यातच, पर्यटनस्थळांसाठी धबधबा (Waterfall) किंवा पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या जात आहेत. मात्र, या पर्यटनस्थळांना भेटी देताना हुल्लडबाजी आणि दंगा मस्ती करतानाचेही अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. त्यातूनच अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे, स्थानिक प्रशासनाकडून अशा काही धोकादायक ठिकाणांवर पर्यंटकांना बंदी घातली आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरणार्‍या पालघर जिल्ह्याच्या वसईतील चिचोंटी धबधब्याजवळ शनिवारी पर्यंटकांनी एकच गर्दी केली होती. बंदी हुकूम डावलून पर्यंटक येथे हुल्लडबाजी करत असल्याचे काही सुजाण पर्यटक व नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर, त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच येथील नायगाव पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन पर्यटकांना पोलिसी खाक्या दाखवा. तसेच, येथील सर्वच पर्यटकांना धबधबा आणि येथील मनाई आदेश असलेल्या पर्यटन ठिकाणाहून बाहेर काढले.


नायगाव पूर्वेच्या चिचोंटी येथे असलेल्या डोंगरावर पावसाळ्यात धबधबा तयार होतो. त्यामुळे तेथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, हे ठिकाण पावसात धोकादायक ठरत असते. दरवर्षी पावसाळ्यात 4 ते 5 जणांचा धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू होतानाच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यातच 4 तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे पालघर जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांनी येथे मनाई हुकूम काढून बंदी घातली होती. शनिवारी सकाळपासून तेथे बंदी हुकूम डावलून पर्यटकांनी गर्दी केली होती. नायगाव पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पर्यटकांना बाहेर काढले. या ठिकाणी जाणारी पायवाट अरुंद आहे. दगडांवर शेवाळ साचल्याने ते निसरडे होऊन खाली पडण्याची शक्यता असते. धबधब्याचा डोह खोल असून पाण्याचा प्रवाह असल्याने पट्टीचे पोहणारे देखील बुडत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांनी जाऊ नये असे आवाहन नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी केले आहे.


दरीत कोसळून रिल्सस्टार तरुणीचा मृत्यू


दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील खाणगाव येथील तुर्भे जलविद्युत केंद्राजवळ मुंबईच्या माटुंगा परिसरातील एक मुलगी खोल दरीत पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे ही मुलगी रील्सस्टा म्हणून प्रसिद्ध होती. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्सही होते. येथील दरीजवळ रिल शुट करण्याच्या नादात तिचा तोल गेला आणि तीच्या जिवावर बेतलं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून रायगड जिल्हा प्रशासनानेही येथील पर्यटनस्थळी बंदीचे आदेश लागू केले आहेत.  


हेही वाचा


धक्कादायक! 3 वर्षांपासून बेपत्ता, पण मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकला; वृ्द्धाच्या मुलाने घेतली पोलिसात धाव