मुंबई :  राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला (ladki Bahin Yojana) महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत 72 लाख अर्ज सरकारकडे आले आहेत. दररोज 8 ते 10 लाख अर्ज येत असल्याचं महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे या योजनेवरुन सरकार प्रसिद्धीच्या झोतात असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपल्या प्रत्येक भाषणात या योजनेचा उल्लेख करताना दिसून येतात. तर, विरोधकांकडून या योजनेवरुन सरकारची खिल्ली उडवली जात आहे. आता, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनीही लाडकी बहीण योजनेवरुन सरकावर टीका केली. त्यानंतर, भाजपकडून जरांगेंवर पलटवार करण्यात आला आहे. आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगेंवर खोचक टीका केली आहे. आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात, सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत, असा इशाराच जरांगेंना दिला आहे. 


जरांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटतेय. गोरगरीब महिलांना, भाऊ-बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी केल्याचा फुटकळ आरोप ते करत आहेत. या योजनेतून मराठा समाजातील गरीब महिलांनाही मदत होणार आहे. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपेक्षित, वंचित सर्व गरीब घटकांना न्याय मिळणारी ही योजना आहे. पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत, असा इशाराच प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा शासनातील नेते आणि जरांगे यांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 






लाडकी बहीण योजनेवर जरांगे काय म्हणाले


नवीन काहीतरी योजना आणतात, लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी-लाडका मेहुणा योजना आणतील. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तुम्ही 1500 रुपये देतात ते तीन दिवस पुरणार नाहीत. 1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का? अशी जोरदार टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहिण योजनेवरून राज्य सरकारवर केली आहे. आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.


हेही वाचा


त्यांच्यावर कारवाई कधी?, मी जवळून पाहिलंय; UPSC परीक्षेतील बोगसगिरीवर प्रियंका गांधींचा संताप