कल्याण : अंबरनाथमधील एका 24 वर्षीय तरुणाचा कोरोनासदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे. या तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल येईपर्यंत मृतदेह ताब्यात देण्यास उल्हासनगरच्या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयाने नकार दिला आहे. कोरोनासदृश्य लक्षणं असल्यानं हा तरुण शुक्रवारी अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. तिथे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला उल्हासनगरच्या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याचा कोरोना चाचणी अहवाल येणं बाकी असल्यानं त्याचा मृतदेह लगेच कुटुंबियांच्या ताब्यात देता येणार नसल्याची भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे.
अहवाल निगेटिव्ह आला तरच लेखी हमीवर मृतदेह देणार
या मृत तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरच त्याचा मृतदेह धार्मिक रिवाजाप्रमाणे अंत्यविधी करण्यासाठी कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल. मात्र त्यावेळीही सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचं पालन करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करावे लागतील. तशी लेखी हमी कुटुंबियांना द्यावी लागेल, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.
अहवाल पॉझिटिव्ह आल्यास मृतदेह मिळणार नाही
या मृत तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर मात्र त्याचा मृतदेह कुटुंबियांना दिला जाणार नाही. तो शासकीय यंत्रणांद्वारे दहन करून नष्ट केला जाईल. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो कुठल्याही धर्माचा असला, तरी मृतदेह दहन करण्याचा प्रोटोकॉल असल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.
यापूर्वी उल्हासनगरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे जास्त काळजी
उल्हासनगरमध्ये यापूर्वी अशाचप्रकारे खन्ना कंपाउंड भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोनासदृश्य आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल येणं बाकी असल्यानं कुटुंबियांकडून गर्दी न करण्याची आणि मृतदेह न उघडण्याची लेखी हमी घेऊन मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला. मात्र कुटुंबियांनी मृतदेह उघडून त्याला अंघोळ घातली. हा प्रकार समजताच उल्हासनगर महापालिकेनं 70 जणांना क्वॉरंटाईन केलं होतं. त्यापैकी 10 जण नंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यामुळे या घटनेनंतर कोरोनासदृश्य आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह अहवाल निगेटिव्ह आला तरच कुटुंबियांना देण्याचा आणि तोवर मृतदेह रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Corona 100 Updates | कोरोना व्हायरसचे शंभर अपडेट्स