सोलापूर : सोलापूरातील काँग्रेस भवनात युवक कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेस कार्यकारिणीत स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांनी सोलापूरातील काँग्रेसभवनाची तोडफोड केली आहे.

युवक कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात प्रचंड घोषणाबाजी करत गोंधळ घातला. सुशीलकुमार शिंदे यांना केंद्रीय कार्यकारिणीत सन्मानाने घेण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. तसेच शिंदेंना कार्यकारिणीतून वगळ्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच पक्षाच्या कार्यसमितीची घोषणा केली आहे. त्यातून सुशीलकुमार शिंदेंसह देशातील काही दिग्गज नेत्यांना वगळण्यात आले आहे. पक्षाच्या या भूमिकेवर नाराज होत कार्यकर्त्यांनी निर्दशने केली. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या निदर्शनाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.

या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून 5 जणांना संधी देण्यात आली आहे. यात मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांचा समावेश आहे.