मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून त्या दृष्टीने तयारी सुरु असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर सरकारच्या तिजोरीवर 21 हजार 530 कोटींचा बोजा पडणार आहे.


केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. त्यानुसारच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही लाभ दिले जातील. यासाठी अर्थसंकल्पात 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वेतन आयोग लागू करताना थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन ते अडीच महिन्यात पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. परिणामी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी चांगलीच उत्साहात साजरी होणार आहे.